Drunk Driving : पीएमपीएमएल चालकाकडून शिक्रापुरात प्रवाशाला मारहाण
esakal June 24, 2025 04:45 PM

शिक्रापूर : येथील चौकात सोमवारी (ता. २३) पीएमपीएमएल बसच्या चालकाने पुणे ते तळेगाव ढमढेरे मार्गावरील एका प्रवाशाला बस थांबवून अक्षरश: कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. या वेळी उपस्थित प्रवासी, वाहक यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, तरी तो आवरत नसल्याने अखेर समोरून आलेल्या दुसऱ्या बसमधील वाहक-चालकानी त्याला अटकाव घालून हा प्रकार थांबविला.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुण्याहून प्रवासी घेऊन आलेल्या एका पीएमपीएमएल बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव बस चालवीत असल्याने सर्व प्रवासी तणावात होते. त्याचे चालविणे हे अपघात होईल, अशाच पद्धतीने असल्याने प्रवासी जेव्हा शिक्रापुरातील तळेगावकडे वळणाऱ्या चौकात उतरले, तेव्हा काही प्रवासी लगेच पुढे सरसावले व त्यांनी थेट बस चालकाला जाब विचारायला सुरवात केली. हा प्रकार चालकाला सहन झाला नाही. त्याने तत्काळ आपल्या कमरेचा पट्टा काढून जाब विचारणाऱ्या प्रवासी युवकालाच थेट मारहाण सुरु केली.

हा चालक इतका बेभान झाला होता की, तो कुणालाच आवरेनासा झाला होता. अखेर दुसऱ्या बाजूने आलेल्या बसच्या चालक व वाहकांनी आपली बस बाजूला लावून या चालकाला पकडून बसमध्ये बसविले. मात्र, जादा नशेमुळे तो कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याने सर्वच जण हैराण होते.

दरम्यान, शिक्रापूर येथे घडलेल्या घटनेबाबत फोनवर माहिती मिळाली असून, सदर व्हिडीओची शहानिशा व चौकशी करून संबंधित चालकावर कठोर कारवाई करू, असे बस आगार व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.