हास्याचे महत्त्व
esakal June 25, 2025 09:45 AM

- डॉ. सचिन जैन, संस्थापक-संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड

हसा लेक हो आणि हसवा - पु. ल. देशपांडे यांनी विविध माध्यमातून, लेखामध्ये, पुस्तकांमधून हा संदेश लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. नुसते स्मित हास्य केले तर चेहऱ्यावरच्या १५-१७ स्नायूंचा व्यायाम आणि उपयोग होतो. मन उदास किंवा विचलित असल्यास फक्त चेहऱ्यावर स्मित हास्य आणा आणि बघा तुमचे स्नायू किती शिथिल होतात आणि मन निवांत आणि सुखद होते. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर हा साधा प्रयोग करून बघा.

हे सगळे सांगण्यामागचा उद्देश हा आपल्या लेख-श्रृंखलेच्या विषयाला धरून महत्त्वाचा आहे. कुठलेही काम अडलेले असल्यास ते हसत हसत जेवढ्या सहजतेने होऊ शकते तेवढे कुठलेही कौशल्य सोप्या सरळ पद्धतीने करू शकत नाही. कामाच्या ठिकाणी आपण हलके वातावरण बनवू शकू तेवढी आपल्या सहकार्याची कार्यक्षमता वाढते.

प्रसन्न वातावरण काम करायला प्रोत्साहन देते. आपण प्रत्येक ठिकाणी टीका, तक्रार करू लागलो तर कामाचा वेग मंदावतो. त्याचा परिणाम निकालावर दिसतो. मग तो अभ्यासाचा असो, व्यवसायाचा असो किंवा नोकरीचा. काम, अभ्यास, परिश्रम करताना मनावर, शरीरावर त्याचा ताण येणारच. या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला आणि आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करण्याची जबाबदारी घेतल्यास उत्तम नेता म्हणून तुमची ओळख निर्माण होऊ शकते.

प्रेक्षकांना आपल्या भाषणामध्ये बांधून ठेवायचा असल्यास हलके फुलके विनोद, हास्य करणे अनिवार्य आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष पुन्हा आपल्या बोलण्यावर केंद्रित होते.

कामात ही असेच आहे. अभ्यास करतानाही काही वेळेनंतर लक्ष केंद्रित करणे अवघड होते, त्यावेळी असा विसावा घेणे जरुरी आहे.

प्रत्येकालाच ही कला अवगत नसते. परंतु दिलखुलासपणे हसायला कला-कौशल्यच असावे असे नाही तर दुसऱ्याची प्रशंसा करण्याएवढे मन मोठे करणे आवश्यक आहे.

हे केल्यास आपले आयुष्य, व्यावसायिक आयुष्य यशस्वी आणि सुंदर होणार.

आपण दुसऱ्या व्यक्तीस आपल्याबरोबर बोलण्यास ‘कम्फर्ट’ करतो तेव्हा तो/ती कामाच्या असेल, करिअरच्या अभ्यासाच्या अशा विविध पैलुतील समस्या चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न करतात आणि याचा फायदा नक्कीच आपल्या/त्यांच्या कामाच्या स्वरूपात होतो. याचा फायदा फक्त समोरच्यालाच नाही तर आपल्यालाही निर्णयांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी होतो. दुसऱ्यांचा समस्यांचा विचार करत नवीन पैलू लक्षात येतात आणि आपल्या पुढच्या आयुष्याच्या दिशा ठरविण्यास मदत करतात.

तुम्हाला विनोद करण्याची कला अवगत असल्यास दिलखुलासपणे हसून त्यात सहभागी होऊ शकतात. तसेच थोडे प्रयत्न करून आपण असे प्रसंग, कार्यक्रम आयोजित करू शकता. विशेष करून आपल्या व्यावसायिक जीवनातील लोकांसाठी ‘आउट ऑफ द वे’ जाऊन हे करणे जास्त उपयोगी.

एक तर ही वेगळी बांधिलकी निर्माण करते, माणसांच्या मनातील दऱ्या कमी करून जवळीक निर्माण करतात आणि मग तुमचे सहकारी तुमच्या निर्देशाला/मताला स्वच्छ मनाने ऐकून त्यावर अंमलबजावणी करण्यास तत्पर होतात. म्हणून हसणे-हसवणे-वातावरण निर्मिती करणे अशा छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करणे, या सगळ्या कला हळूहळू अमलात आणणे आपल्या यशस्वी भविष्याकडे घेऊन जातील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.