पहिला कसोटी गमावल्यानंतर हरभजन सिंग संतापला, प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची केली मागणी
GH News June 25, 2025 06:13 PM

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. दोन्ही डावात मिळून पाच शतकं आली. मात्र फलंदाजांच्या तुलनेत भारतीय गोलंदाजी पूर्णपणे फेल गेली. दुसऱ्या डावात विजयासाठी दिलेल्या 371 धावा रोखण्यात भारतीय गोलंदाज पूर्णपणे फेल गेले. बेन डकेट आणि जॅक क्राउली यांनी पहिल्या विकेटसाटी 188 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडताना भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आले. शेवटच्या टप्प्यात विकेट मिळाल्या पण तिथपर्यंत भारताची सामन्यावरील पकड सैल झाली होती. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. हेडिंग्लेमधील पराभवानंतर हरभजन सिंग याने स्वत:च्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘आता टीम इंडियावर दबाव असेल. कारण मालिकेत टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे. माझ्या मते कुलदीप यादवला पुढच्या सामन्यात संधी मिळायला हवी. जर त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली तर टीम इंडियाकडे विकेट घेण्यासाठी पर्याय वाढेल.’

‘कुलदीप यादव कोणाच्या जागेवर प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवेल हा प्रश्न आहे. शार्दुल ठाकुर? मी सांगितलं होतं ती शार्दुलकडून अधिक गोलंदाजी करायला हवी होती. पण त्याच्या हाती तेव्हा चेंडू सोपवला जेव्हा इंग्लंडला विजयासाठी 100-120 धावा हव्या होत्या. त्याला संधी मिळायला हवी. जर तुम्ही शार्दुलला फलंदाज म्हणून खेळवत असाल तर आणि थोडीशी गोलंदाजी द्याल तर ते चुकीचं आहे. तो एक गोलंदाज आहे आणि फलंदाजी करू शकतो.’, असंही हरभजन सिंग याने पुढे सांगितलं.

‘पुढच्या कसोटी सामन्यात हा बदल होणं अपेक्षित आहे. नाही तर मी आधीच स्पष्ट केलं आहे की हा इंग्लंड दौरा आहे. अनेक संघ या ठिकाणी विजयी मिळवण्यात अपयशी ठरेल आहेत. जर तुम्ही असे खेळता आणि 450 धावा पहिल्या डावात करूनही पराभूत होत असाल, तर मला वाटत की तुम्ही एक संधी गमावली आहे.’, असंही हरभजन सिंग पुढे म्हणाला. दरम्यान गोलंदाजांसोबत भारताचं क्षेत्ररक्षणही सुमार होतं. झेल सोडल्याने भारतावरील दबाव वाढत गेला आणि धावगती कायम राहिल्याने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात पुढचा कसोटी सामना 2 जुलैपासून होणार आहे. हा सामना एजबॅस्टन स्टेडियममध्ये होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.