Sangli Police : पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर आज काळाने घाला घातला. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास विश्रामबाग उड्डाणपुलावर भरधाव डंपरने त्या दांपत्याच्या दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पतीच्या डोळ्यासमोर घडली.
पूनम गोविंद नलवडे (२५, रा. कवलापूर, ता. मिरज) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. या अपघातात पती सुशांत जाधव हेही जखमी झाले असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपरचालकास पकडून चोप दिला. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकास ताब्यात घेतले. श्रीकांत नंदकुमार लमाण (रा. जत) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी उशिरा घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की दीड वर्षांपूर्वी पूनम आणि सुशांत यांचा विवाह झाला होता. पूनम या विश्रामबाग येथील कल्लोळी रुग्णालयात काम करत; तर सुशांत हे एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामास आहेत. दोघेही दुचाकी (एमएच १०, डीएन ५१००) वरून कामासाठी यायचे. आजदेखील दहाच्या सुमारास ते घरातून निघाले. त्यावेळी साडेदहाच्या सुमारास कुपवाडकडून विश्रामबागकडे येत होते. त्यावेळी पूल चढतानाच मागून भरधाव वेगाने काँक्रिट मिक्सरचा डंपर (एमएच १७, बीडी ९१२२) येत होता. त्याने पाठीमागून जोराची धडक दांमत्याला दिली. यावेळी पूनम या चाकाखाली सापडल्या. त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुशांत हे जखमी अवस्थेत पडले.
Sangli : स्वप्नांची खुडली कळी, बापानेच घेतला बळी !दरम्यान, हा थरारक प्रकार पाहून नागरिकांनी धाव घेतली. काही अंतरावर डंपरचालक श्रीकांत लमाण याला अडवून संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिला. यावेळी संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोघांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. उपचारापूर्वीच पूनम यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळावरून डंपरचालक श्रीकांत लमाण यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात सायंकाळी उशिरा संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
स्वप्नांचा झाला चुराडा
पूनम आणि सुशांत यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांनीही संसाराचा गाडा ओढत अनेक स्वप्नं पाहिली होती. काळाने घाला पडल्याने या नवदांपत्याच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाल्याचे सांगत नातेवाईकांचे डोळे पाणावले. या घटनेची माहिती कवलापूर परिसरात कळल्यानंतर शोककळा पसरली.
अन् त्यांना चक्कर आली
घटनेनंतर पूनम या निपचीत पडल्या होत्या. आपल्या पत्नीला उठवण्याची धडपड त्या पतीची सुरू होती. त्यात तिने सोबत आणलेला जेवणाचा डबा, पाण्याची बाटलीही रस्त्यावर पडली होती. अखेर दोघांना एकाच वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले. पूनम यांना वाचवण्यासाठी शेवटचे प्रयत्न करण्यासाठी अतिदक्षता विभागात नेले. तोवर सुशांत हे देवाकडे प्रार्थना करत आशेने वाट पाहत होते. तेवढ्यात डॉक्टारांनी ‘सॉरी’ असे सांगताच सुशांत चक्कर येऊन पडले. यामुळे नातेवाईकांसह रुग्णालयातील साऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आले.