
बॉलीवूड अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. अशातच अलीकडे एका मुलाखतीत गोविंदाने त्याला हॉलीवूडच्या ‘अवतार’ सिनेमाचीही ऑफर असल्याची माहिती दिली. तसे ही ऑफर नाकारल्याचेही त्याने म्हटले. मात्र आता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनीच त्याची पोलखोल केली आहे. सुनीता आहुजा यांनी नुकतीच उर्फी जावेदच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या वेळी अशी कुठली ऑफर आल्याचे माहीत नसल्याचे सांगितले.
‘‘गोविंदाला खरंच ‘अवतार’ची ऑफर होती का?’’ या प्रश्नाचे उत्तर देताना सुनीता आहुजा म्हणाल्या, ‘‘मला खरंच माहीत नाही त्याला कधी हा सिनेमा ऑफर झाला होता. गोविंदा आणि मी 40 वर्षांपासून एकत्र राहत आहोत.
‘अवतार’ सिनेमाचे प्रोडय़ुसर आणि डायरेक्टर कधी आले मला माहीत नाही. त्याला सिनेमा ऑफर झालेला की नाही हेदेखील मला माहीत नाही. मी खोटं बोलणार नाही. मी कोणाची बाजूही घेणार नाही आणि खोटय़ा व्यक्तींना प्रोत्साहनही देणार नाही.’’
काय म्हणाला होता गोविंदा?
‘‘मी अमेरिकेत एका सरदारजीला भेटलो होतो. त्यांना मी एक बिजनेस आयडिया दिली होती, ज्यामुळे त्यांना फायदा झाला होता. काही वर्षांनंतर त्यांनी माझी जेम्स कॅमेरुनशी भेट घडवून दिली. जेम्स कॅमरुन यांनी मला डिनरसाठी बोलवलं होतं. मी सिनेमाचं नाव सुचवलं ‘अवतार.’ जेम्स यांनी मला सांगितलं सिनेमाचा हिरो दिव्यांग आहे. त्यामुळे मी या सिनेमासाठी नकार दिला. त्यांनी मला 18 कोटी रुपये मानधन मिळेल असे सांगितले,’’ असे गोविंदा मुलाखतीत म्हणाला.