Maharashtra Politics : मोठी बातमी! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार
Sarkarnama June 27, 2025 07:45 PM
Raj Uddhav Thackeray will hold a joint march : मोठी बातमी! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार

महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे यांनी पाच जुलैला मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते. या मोर्चात उद्धव ठाकरे हे देखील समील होणार आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे हे सात जुलैला मोर्चा काढणार होते. मात्र, संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली की महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!

Sharad Pawar On Hindi : पहिली ते चौथी हिंदीची सक्ती योग्य नाही - शरद पवार

महाराष्ट्रातील लोक हिंदीच्या विरोधात नाही. मात्र, पहिली ते चौथी हिंदी सक्ती योग्य नाही, असे शरद पवार म्हणाले. हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. पाचवीपासून हिंदी शिकवण्यात हरकत नाही. मुंबईत दोन्ही ठाकरेंचे म्हणणे समजून घेणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.

नितेश राणेंच्या विरोधात अजामीनपात्र अटक वाॅरंट

मत्स व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना संजय राऊत यांच्या विरोधात केलेले वक्तव्य भोवले आहे. राऊत यांनी नितेश राणेंच्या विरोधात 2023 मध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात नितेश राणेंच्या विरोधात माझगाव कोर्टाने अजामीनपात्र वाॅरंट जारी केले आहे.

gunaratna sadavarte on raj thackeray : राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी नको, अॅड. सदावर्तेंचे पोलिसांना पत्र

पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाला राज ठाकरेंनी विरोध केला आहे. या धोरणाच्या विरोधात ते पाच जुलैला मोर्चा काढणार आहेत. मात्र, राज ठाकरेंच्या मोर्चाला अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. या मोर्चाला परवानगी मिळू नये म्हणून आपण मुंबई पोलिस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिले असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.