Maharashtra Politics: मोठ्या शिलेदारानंतर आता सरपंचानेही ठाकरेंची साथ सोडली, महायुतीच्या पक्षात प्रवेशाची चर्चा
esakal June 28, 2025 02:45 AM

डी. के. वळसे पाटील

मंचर : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे आंबेगाव तालुकाप्रमुख आणि मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी आपल्या तालुका प्रमुखपदाचा राजीनामा शुक्रवारी (ता. २७) शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्याकडे सुपूर्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून गांजाळे हे पक्षाच्या कार्यक्रमांपासून अलिप्त होते. विशेषतः मंचर येथे त्यांनी केलेल्या उपोषणाच्या वेळी पक्षाचा बॅनर न वापरणे, ही बाब चर्चेचा विषय बनली होती. तेव्हापासूनच "जय महाराष्ट्र" करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीतील एका घटक पक्षात ते पाच माजी ग्रामपंचायत सदस्यांसह प्रवेश करण्याच्या तयारीत असून, शिवसेना (शिंदे गट) मधील काही प्रमुख कार्यकर्तेही त्यांच्याशी संपर्कात असल्याचे समजते.

गांजाळे यांचा राजकीय प्रवास

सन २००६ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांजाळे यांनी राजकारणात प्रवेश केला. २०१५ मध्ये मंचर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अनेक दावेदार असतानाही आढळराव पाटील यांनी गांजाळे यांना संधी दिली. कोरोना काळात त्यांच्या कार्याचे मंचर परिसरात विशेष कौतुक झाले होते. मात्र त्यानंतर आढळराव पाटील शिंदे गटात गेल्यानंतर गांजाळे त्यांच्याबरोबर जातील असे वाटत होते. पण ते गेले नाहीत. दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. अशी चर्चा त्यावेळी झाली होती

दरम्यान, २०२३ मध्ये ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेशराव भोर यांनी अनेक दिग्गज इच्छुकांना डावलून गांजाळे यांच्यावर विश्वास दाखवून त्यांची तालुका प्रमुखपदी नियुक्ती केली होती. सुरुवातीला त्यांनी संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेतला, मात्र गेल्या काही महिन्यांत भोर व जिल्हा संघटक राजाराम बाणखेले यांच्यासोबतही गांजाळे यांचे मतभेद उघड झाले होते.

Navi Mumbai News: मुसळधार पावसाचा फटका! नवी मुंबईत धोकादायक इमारतीचा भाग कोसळला राजीनाम्यानंतर पुढे काय?

गांजाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट सांगितले की, "महायुतीतील एका घटक पक्षात प्रवेशासाठी माझ्याशी संपर्क करण्यात आला आहे. माझ्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून योग्य निर्णय घेईन." मात्र कोणत्या पक्षात प्रवेश करणार, हे त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.