ENG-U19 vs IND-U19: फ्लिंटॉफचा पोरगा भारताला नडायला गेला; पण, वैभव सूर्यवंशीसह सर्वांनी त्याच्यासह इंग्लंडला इंगा दाखवला
esakal June 28, 2025 03:45 AM

INDIA MENS U19 IN ENGLAND ODI SERIES 2025 Youth List-A Match : भारताच्या युवा खेळाडूंनी आज इंग्लंडमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. १९ वर्षांखालील संघही इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि पहिल्या लिस्ट ए सामन्यात त्यांनी विजयाच्या दिशेने कूच केली आहे. इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्य्रू फ्लिंटॉफच्या मुलाने भारतीय गोलंदाजांना चांगला चोप दिला, परंतु वैभव सूर्यवंशीने इंग्लंडला जमिनीवर आणले.

प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडसंघाला ४२.२ षटकांत १७४ धावांवर भारतीय गोलंदाजांनी गुंडाळले. बेन डॉवकिन्स ( १८) व इसाक मोहम्मद यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली होती. हेनिल पटेलने पहिला धक्का देताना बेनला बाद केले. त्यानंतर एब्रिशने इंग्लंडच्या बेन मायेसला ( १६) माघारी पाठवले. पण, मोहम्मद व रॉकी फ्लिंटॉफ यांनी दमदार खेळ केला. मोहम्मद २८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४२ धावांवर बाद झाला.

फ्लिंटॉफने ९० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. पण, या विकेटनंतर इंग्लंडचा डाव गडगडला. ५ बाद ११३ वरून ते सर्वबाद १७४ धावांवर गुंडाळले गेले. भारताच्या कनिष्क चौहानने १०-१-२०-३ अशी स्पेल टाकली. त्याला पटेल, अंब्रिश व मोहम्मद ईन्नान यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत साथ दिली. वैभव सूर्यवंशीनेही १ षटक फेकले व दोन धावा दिल्या.

Viral Video: विराटच्या टिप्स ऐकल्या नाही, म्हणून आम्ही कसोटी वर्ल्ड कप जिंकलो; टेम्बा बवुमाचे धक्कादायक विधान, जाणून घ्या सत्य

प्रत्युत्तरात वैभव सूर्यवंशी व आयुष म्हात्रे यांनी ८.४ षटकांत ७९ धावा चोपल्या. कर्णधार म्हात्रे ३० चेंडूंत ४ चौकारांसह २१ धावांवर बाद झाला. वैभवने १९ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ४८ धावांची वादळी खेळी केली. मौलिराजसिंग चावडा १६ धावांवर बाद झाला, परंतु भारताने १२.१ षटकांत ३ बाद ९९ धावा करून विजयाच्या दिशेने कूच केली आहे. भारताला विजयासाठी ७६ धावांची गरज आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.