Navi Mumbai News: मुसळधार पावसाचा फटका! नवी मुंबईत धोकादायक इमारतीचा भाग कोसळला
esakal June 28, 2025 06:45 AM

नवी मुंबई : पारसिक हिलवरील धोकादायक असलेल्या इमारतीचा काही भाग शुक्रवारी (ता. २७) पहाटे मुसळधार पावसात कोसळला. गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतीत कुणीच राहात नव्हते. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही; मात्र सदर इमारतीचा काही भाग इमारतीखाली उभ्या असलेल्या दोन वाहनांवर कोसळल्याने त्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बेलापूर येथील पारसिक हिलवरील अनेक इमारती गेल्या काही वर्षांपासून रिकाम्या असून, यातील काही इमारती जर्जर झाल्या आहेत. यातच गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने यापैकीच एक असलेल्या इमारतीचा काही भाग शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसात कोसळला.

या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या बेलापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकून पडलेली वाहने बाजूला काढली. महापालिकेने नुकतीच शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून, या यादीमध्ये सदर इमारतीचाही समावेश असल्याचे बेलापूर अग्निशमन दलाचे सहाय्यक केंद्र अधिकारी रामचंद्र चौधरी यांनी सांगितले.

Water Supply: कल्याण-डोंबिवलीत पाणीबाणी! 'या' भागात १ जुलैला पाणीपुरवठा बंद ५०१ धोकादायक इमारती घोषित

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे २०२५-२६ या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करून एकूण ५०१ इमारती धोकादायक असल्याचे महापालिकेने नुकतेच घोषित केले आहे. यामध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तत्काळ निष्कासित करणे अशा सी-१ प्रकारात मोडणाऱ्या ५१ इमारतींचा समावेश आहे. तसेच इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे अशा सी-२ प्रकारामध्ये मोडणाऱ्या १०४ इमारती आणि इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे अशा सी-२ बी प्रकारातील २९७ इमारतींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे इमारतीची किरकोळ दुरुस्ती या सी-३ प्रकारामध्ये मोडणाऱ्या ४९ इमारती आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.