Latest Maharashtra News Updates : श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास दर्शन सुरू राहणार
esakal June 28, 2025 12:45 PM
Bangalore Stampede : चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीबाबत पुढील आठवड्यात अहवाल सादर होणार

बंगळूर : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या (आरसीबी) विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीबाबत शहर जिल्हा दंडाधिकारी जगदीश पुढील आठवड्यात अहवाल सादर करण्याची तयारी करत आहेत. सरकारने तपास अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची दिलेली मुदत वाढवण्याची परवानगी दिल्यानंतर तपास अधिकारी जगदीश यांनी दुर्घटनेच्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन्ही आयपीएस अधिकाऱ्यांना अनेकवेळा नोटिसा बजावल्या होत्या. अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ घेतला होता. हजर झालेल्या दोघांचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. माजी शहर पोलिस आयुक्त दयानंद हे त्यांच्या वकिलासह खासगी कारने के. जी. रोडवरील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात आले. चेंगराचेंगरीचे कारण काय होते? परवानगी नसतानाही आरसीबीला विजय साजरा करण्याची परवानगी का देण्यात आली? चिन्नास्वामी स्टेडियमजवळ सुरक्षेसाठी किती पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले होते? अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमली असतानाही प्रवेशद्वारासमोर अधिक पोलिस अधिकारी का तैनात करण्यात आले नाहीत, असे प्रश्न विचारले. आरसीबी, डीएनए आणि केएससीएच्या प्रमुखांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. वरिष्ठ कायदा आणि सुव्यवस्था पोलिस आणि वाहतूक पोलिसांचे जबाब नोंदवण्यात आल्याचे कळते. तपासणीत असे दिसून आले की, प्रवेशद्वारासह मोक्याच्या ठिकाणी बॅरिकेडस् लावले नव्हते. पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हते. शेवटच्याक्षणी मोफत प्रवेश जाहीर करण्यात आला होता.

Canara Bank : मनगोळी कॅनरा बँक लूटप्रकरणी व्यवस्थापकासह तिघांना अटक

बंगळूर : कॅनरा बँकेच्या मनगोळी शाखेत ५३.२६ कोटींचे सोने आणि रोख रक्कम लुटल्याप्रकरणी बँक व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. बँक व्यवस्थापक विजयकुमार मिरियाल (वय ४१) आणि त्याचे सहकारी चंद्रशेखर नेरेला (३८) आणि सुनील नरसिम्हालू मोका (४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्ह्यात वापरल्या गेलेल्या दोन मोटारी आणि वाहनांमधून नेलेले १०.५ किलो सोने जप्त केले आहे.

Kiren Rijiju : किरेन रिजिजू निवडणार भाजप प्रदेशाध्यक्ष, पक्षाकडून निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली : राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीपूर्वी भाजपला विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतील प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती. त्यांच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Satara Water Supply : साताऱ्यात पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार

सातारा : शहापूर योजनेच्या विद्युत वाहिनीच्या स्थलांतरणाचे काम वीज वितरण कंपनीकडून हाती घेण्यात येणार आहे. यामुळे शहापूर योजनेतून पाणी उपसा होऊन पुरेशी पाणीपातळी उपलब्ध होणार नाही. यामुळे मंगळवार (ता. एक जुलै) आणि बुधवार (ता. दोन जुलै) या दोन दिवशी या योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Ashadhi Wari : श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास दर्शन सुरू राहणार

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या महासोहळ्याला आजपासून सुरवात झाली आहे. आषाढी वारीसाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी शुक्रवारपासून (ता. २७) श्री विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. प्रक्षाळपूजेपर्यंत भाविकांसाठी विठ्ठल मंदिर रात्रंदिवस खुले राहणार आहे.

Kolhapur News : दहा जुलैपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा आदी प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच विविध पक्षांकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात २८ जून ते १० जुलैपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी बंदी आदेश जारी केला आहे.

Almatti Dam : आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात १० जुलैला मोर्चा; सतेज पाटील, राजू शेट्टी यांची माहिती

कोल्हापूर : ‘महापूर नियंत्रणासाठी येणाऱ्या पैशांचे वाटोळे केले जात आहे. जागतिक बँकेकडून पैसे मिळतात म्हणून गटारी साफ करत असला तर कायमच पुराच्या पाण्यात गटांगळ्या खात बसावे लागणार आहे. हिप्परगी आणि आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात १० जुलैला सकाळी साडेअकरा वाजता सांगली पाटबंधारे विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला.

Shefali Jariwala : काटा लगा गर्ल अन् बिग बॉस फेम शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन

Latest Marathi Live Updates 28 June 2025 : काटा लगा गर्ल आणि बिग बॉस १३ मधील प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटक्यामुळे तिचा मृत्यू झाला. तसेच ‘मराठी’च्या मुद्यावरून ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झाले आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे भाऊ तब्बल अठरा वर्षांनंतर प्रथमच प्राथमिक शिक्षणातील त्रिभाषा सूत्राच्या विरोधात एकत्रितपणे रस्त्यावर उतरणार आहेत. या दोन्ही बंधूंनी हे युतीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल मानले जात आहे. महाराष्ट्राला या मोर्चाच्या निमित्ताने पाच जुलै रोजी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. आरोग्य विभागाला गरज नसतानाही नर्सिंग महाविद्यालयासारख्या अनेक महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. अशा अडीचशे संस्थांना परवानगी दिली आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्याचा अभ्यासही आम्ही करीत आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदावरून संजय पवार यांना हटवून कोल्हापूर दक्षिण शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. तर, कोल्हापूर दक्षिण प्रमुखपदी हर्षल सुर्वे यांची व कोल्हापूर उत्तर विधानसभा प्रमुखपदी विशाल देवकुळे यांची नियुक्ती झाली. हिप्परगी आणि आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात १० जुलैला सकाळी साडेअकरा वाजता सांगली पाटबंधारे विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिली. राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीपूर्वी भाजपला विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतील प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.