नारायणगाव, ता. २८ : ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होणार, या अफवांवर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहोत. कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने तयारीला लागावे,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी केले.
येथील पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक नारायणगाव (ता. जुन्नर) येथे आयोजित केली होती. त्यावेळी शेवाळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, तालुकाध्यक्ष तुषार थोरात, विजय कोलते, अनंतराव चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, मोहित ढमाले, अंकुश आमले, राजश्री बोरकर, वल्लभ शेळके, संजय गुंजाळ, शेखर ढवळे, रमेश मेहत्रे, सय्यद पटेल, प्रमोद बोतरणे, अशोक सोनवणे, चंदाताई गाडगे आदी उपस्थित होते.
शेवाळे म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीत कर्जमाफीसह शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केली नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात पुढील काळात आंदोलन करण्यात येईल. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. पक्षवाढीसाठी प्रयत्न करावा. जुन्नर तालुका युवक अध्यक्षची निवड येत्या दोन ते तीन दिवसांत करण्यात येईल.’’
यावेळी जुन्नर, आंबेगाव, खेड व मावळ या तालुक्यांतील पक्ष संघटनेची जबाबदारी निकम यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.