आमदार संतोष बांगर पुन्हा वादात, माझ्या कार्यकर्त्यांना VIP दर्शन द्या, मंदिर समितीवर पत्राद्वारे दबाव
GH News June 29, 2025 01:06 AM

शिवसेनेचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडले आहे. आमदार संतोष बांगर व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर समितीवर दबाव टाकला असल्याचे समोर आले आहे. बांगर यांनी पंढरपूर देवस्थान समितीला एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी माझ्या भावाला आणि कार्यकर्त्यांना VIP दर्शन द्या अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

आमदार बांगर यांचे VIP दर्शनासाठी पत्र

राज्यभरातून वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. शेकडो किलोमीटर पायी चालून वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचत आहेत. पंढरपूरमध्ये आल्यानंतर वारकऱ्यांना विठूरायाच्या दर्शनासाठी कित्येक तास उभे रहावे लागत आहे. मात्र आता आमदार बांगर यांनी मंदिर समितीला पत्र लिहून आपल्या कार्यकर्त्यांना VIP दर्शन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

व्हीआयपी दर्शन सध्या बंद

मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे आदेश दिल्याने VIP दर्शन सध्या बंद आहे. मात्र तरीही बांगर यांनी पत्र लिहून 21 कार्यकर्त्यांना VIP दर्शन देण्याची मागणी केली आहे. दर्शन रांगेत सध्या 50 हजारांपेक्षा जास्त वारकरी उभे आहेत, मात्र वारकऱ्यांचा कोणताही विचार न करता बांगर यांनी व्हीआयपी दर्शनाची मागणी केल्याने अनेक वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

आमदार बांगर याआधीही सापडले होते वादात

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर याआधीही वादात सापडले होते. बांगर यांनी आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरल झाली होती. तसेच याआधी आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक उपाध्याय यांना मारहाण केली होती. प्राचार्य यांचा कानही पिरगळला होता. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे बांगर यांच्यासह 30 ते 40 कार्यकर्ते आणि महाविद्यालयातील 5 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.