Latest Maharashtra News Updates : भाजप आमदार बबन लोणीकर यांच्या कार्यकर्त्यानी बँक अधिकाऱ्याला दिला दम
esakal June 29, 2025 10:45 PM
Nashik Live : सख्ख्या भावावर गोळीबार; मालेगावचा गुन्हेगार अखेर जेरबंद

भांडणात मदत केली नाही, याचा राग मनात धरून मालेगावला सराईताने त्याच्या सख्ख्या भावावर गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अख्तर काल्या उर्फ शाहीद अख्तर शकील अहमद (वय ४०, रा. के. जी. एन. नगर, मालेगाव) असे या सराईतीचे नाव आहे. सख्ख्या भावावर गोळीबार केला. मात्र त्याला मालेगाव पोलिसांनी चाळीसगावला अटक केली आहे. संशयित काल्या याने त्याचा मोठा भाऊ अनिस अहमद शकील अहमद याच्यावर गावठी कट्ट्याने गोळीबार केला. अनिस यांच्या गुडघ्याला गोळी लागल्याने ते जखमी झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अख्तर काल्याला चाळीसगावमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले.

Live : भाजप आमदार बबन लोणीकर यांच्याकार्यकर्त्यानी बँक अधिकाऱ्याला दिला दम

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी बँक अधिकाऱ्याला दम देऊन अपमानास्पद वागणूक दिली. सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपल्याशी हिंदीत आणि मोठ्या आवाजात बोलायचं नाही असा दम दिल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.किसान युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातून अनुदानाची रक्कम कपात केल्याचा आरोप करत बँक अधिकाऱ्याला तंबी दिल्याचं समोर आलं आहे.

Solapur live: आषाढी वारीसाठी पंढरपुरात सुरक्षेचे कडक बंदोबस्त

यंदाच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात सुरक्षेचा भक्कम बंदोबस्त उभारण्यात आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा पंढरीत दाखल झाला आहे.

Solapur Live: विमानतळ परिसरात सुरक्षेचा प्रश्न गंभीर; आता संयुक्त समिती करणार पाहणी

विमानतळावर पाणी साचते आहे. तर सुरक्षाभिंतीला भगदाड पडले आहे. याशिवाय भिंतीलगत अनधिकृत अतिक्रमण करून मंगल कार्यालय अन् कत्तलखाने, उभारले आहेत.

तसेच परिसरात भाजीमंडई असल्याने भटक्या कुत्र्यांसह, जनावरांचाही वावर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने विमानतळावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

येथील धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानतळ प्राधिकरणाला संयुक्त कमिटी गठित करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता या परिसराची पाहणी होणार आहे.

Solapur Live: माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली चितमपल्लींच्या परिवाराची सांत्वनपर भेट

पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या निधनानंतर आज, रविवारी (ता. २९), माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन चितमपल्ली यांचे कुटुंबीय व इतर नातेवाईकांचे सांत्वन केले.

Live : हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात शिवसैनिक आणि मनसे सैनिक आक्रमक

हिंदी भाषा सक्तीला विरोध तसेच भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या शेतकरी वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय. नांदेडच्या देगलूर मध्ये शिवसैनिक आणि मनसे सैनिकांनी एकत्र येत आंदोलन केलं. या आंदोलनात केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांचे पोस्टर देखील जाळण्यात आले. या आंदोलनात शिवसैनिक आणि मनसे सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Nashik Live : ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये आंदोलन

हिंदी सक्ती विरोधात करण्यात आले आंदोलन

हिंदी सक्तीचा जी आर जाळून करण्यात आला निषेध

नाशिकच्या सीबीएस परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ जळाला हिंदी सक्तीचा जी आर

सरकारच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी

महाराष्ट्रात हिंदी सक्ती लादू देणार नसल्याचा दिला इशारा

Live : डाग अच्छे हैं! भाजपची नवीन टॅगलाईन -आदित्य ठाकरेंची टीका

पावसाळी अधिवेशनाआधी मुंबईत महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद पार पडत आहे. या पत्रकार परिषदेत आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार देखील उपस्थित आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजप पक्षावर सडकून टीका केली. डाग अच्छे है, भाजपची ही नवीन टॅगलाईन असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडलं असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

MVA Press Conference Live Updates: डाग अच्छे हैं! भाजपची नवीन टॅगलाईन -आदित्य ठाकरेंची टीका

- पावसाळी अधिवेशनाआधी मुंबईत महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद पार पडत आहे.

- या पत्रकार परिषदेत आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार देखील उपस्थित आहेत.

- यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजप पक्षावर सडकून टीका केली.

- डाग अच्छे है, भाजपची ही नवीन टॅगलाईन असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

- तसेच शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडलं असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

MVA Press Conference Live Updates: भाजपचं भ्रष्टाचारी सरकार- आदित्य ठाकरे

पावसाळी अधिवेशनाआधी मविआची पत्रकार परिषद. आदित्य ठाकरेंची भाजप सरकारवर टिका.

Live : हिंदी सक्तीविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन; येवला आणि मनमाडमध्ये सरकारच्या निर्णयाला विरोध

शिवसेना (ठाकरे गट) ने महाराष्ट्र सरकारच्या शाळांमधील पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला आणि मनमाड शहरांमध्ये शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं.

येवला शहरातील विंचूर चौफुलीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाच्या जीआरची होळी केली. मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा असूनही, पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयामुळे मराठी भाषेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

Live : रिंगणातील पारंपरिक धावण्यात यंदा पोलीस बांधवांनीही सहभाग

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारीतील दुसऱ्या अश्व रिंगण सोहळ्यात एक आगळीवेगळी घटना पाहायला मिळाली. रिंगणातील पारंपरिक धावण्यात यंदा पोलीस बांधवांनीही सहभाग घेत वारकऱ्यांची मने जिंकली.

Live : मराठा आरक्षणासाठी महत्त्वाची बैठक; बीडमधून मराठा बांधव रवाना

मराठा आरक्षणासाठी सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या तयारीत तर दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील आज आंतरवेली सराटी येथे महत्त्वाची बैठक घेणार आहेत.या बैठकीसाठी बीडमधून असंख्य मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघाले आहेत.

Amravati Live : चिखलदरा मार्गावर वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटर पर्यंतच्या लांबच लांब रांगा

वनविभागाच्या एन्ट्री पॉईंटवर पैसे देण्यासंदर्भात काही पर्यटकांनी हुज्जत घातल्याने वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा...

रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांची चिखलदरा जाण्यासाठी मोठी गर्दी..

सध्या पावसामुळे चिखलदऱ्याच सौंदर्य फुलल आहे त्यामुळे पर्यटक चिखलदाराला जात आहे..

Amravati Live : सहायक पोलिस निरीक्षकाच्या हत्येप्रकरणी 3 जणांना अटक

अमरावतीत एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Manoj Jarange Patil Live : मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटीत राज्यव्यापी बैठक

मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज अंतरवाली सराटी मध्ये राज्यव्यापी बैठक होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठा समाज बांधवांची आज दुपारी बारा वाजता बैठक पार पडणार आहे.

Nashik Live : विलास शिंदे ठाण्याकडे रवाना, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे सात ते आठ माजी नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. विलास शिंदे ठाण्याकडे रवाना झाले आहेत.  

Pune : भाजप शहराध्यक्षावर वीज चोरीचा आरोप, काँग्रेसकडून जोरदार टीका

पुण्यात भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर स्वतःच्या कार्यालयासाठी वीज चोरी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपांवरून काँग्रेसकडून जोरदार आक्रमक भूमिका घेतली जात असून, शहरात ठिकठिकाणी “बोला अण्णा, बोला ताई” अशा आशयाचे फ्लेक्स झळकले आहेत. धीरज घाटे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानुसार, त्यांच्या कार्यालयात बिनबिलाची वीज वापरण्यात आली होती. या प्रकारामुळे काँग्रेसने महावितरण कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं होतं.

Mumbai : हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न : अजित पवार

हिंदी सक्ती विरोधात शिवसेना आणि मनसेने मुंबईत ५ तारखेला मोर्चाचे नियोजन केले आहे. मात्र मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न असणार आहे. हिंदी सक्तीबाबत माझी भूमिका स्पष्ट असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय

Kedar Jadhav : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या क्रिकेटरनं घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

भारतीय क्रिकेटपटू आणि अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले केदार जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे कारण केवळ औपचारिक नव्हते, तर बारामतीतील क्रिकेट ग्राउंडशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. केदार जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "माळेगाव साखर कारखान्याच्या यशाबद्दल अजित पवार साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी आलो होतो.

Mumbai : हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची विरोधी पक्ष आज होळी करणार

हिंदी सक्ती निर्णयाच्या विरोधात विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शासन निर्णयाची होळी करण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटासह इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यासाटी उपस्थित राहणार आहेत. हिंदी सक्तीविरोधात एकजुटीची हाक देण्यात आलीय.

Amalner : जळगावमधील माजी आमदाराच्या गाडीचा गुजरातमध्ये भीषण अपघात

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गुजरात येथील सारंगपूर देवस्थानाचे दर्शन घेऊन चौधरी कुटुंब नंदुरबारकडे येत असताना गुजरातमधील वटामन चौकडी येथे गाडीला अपघात झाला.

Rain Update : राज्यात सरासरीच्या 93% पावसाची नोंद, विदर्भ मात्र कोरडा

राज्यात यंदा जून महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून, शनिवारपर्यंत सरासरीच्या 93 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनने राज्यात दमदार एंट्री घेतली असली तरी विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये मात्र अपेक्षेपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात दरवर्षी जून महिन्यात सरासरी 208 मिमी पावसाची नोंद होते. यंदा मात्र, 29 जून (शनिवार) पर्यंत 194 मिमी पाऊस झाला आहे, जो सरासरीच्या सुमारे 93 टक्के इतका आहे.

MSRTC Bus : एसटी बस फक्त ३ नटबोल्टवर धावली, प्रवाशाच्या सतर्कतेमुळं अनर्थ टळला

श्रीवर्धन बस डेपो परिसरात एसटी महामंडळाच्या एक बसमधील धक्कादायक निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. मुंबईहून आलेली ही बस पुढील प्रवासासाठी दिघीकडे रवाना होण्याच्या तयारीत असताना, नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अपघात टळला. या बसचे चाक केवळ तीन नट-बोल्टच्या आधारावर जोडलेले होते, ही बाब एका जागरूक नागरिकाच्या लक्षात येताच त्याने तात्काळ इतर प्रवाशांचे लक्ष वेधले.

Nashik News : नाशिकमध्ये ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार

ठाकरे सेनेचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे हे आज ठाण्यात शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. या प्रवेश कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार असून, ठाण्यात मोठ्या राजकीय शक्तिप्रदर्शनाची तयारी झाली आहे. नाशिकमधून शेकडो वाहनांचा ताफा लवकरच ठाण्याकडे रवाना होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.