पारिसक टेकडीवरील धोकादायक इमारत हटवली
esakal June 30, 2025 01:45 AM

वाशी, ता. २९ (बातमीदार) : बेलापूर सेक्टर २६ येथील भूखंड क्रमांक ५९ वरील धोकादायक स्थितीतील इमारतीचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून बेलापूर विभाग कार्यालयाच्या वतीने या इमारतीची पाहणी करून ती इमारत पूर्णपणे पाडून जमीनदोस्त करण्यात आली आहे.
पारसिक टेकडीवरील ही धोकादायक इमारत २०२०-२०२१ या वर्षी सी-२ बी प्रवर्गामध्ये मोडत असल्याचे पालिकेकडून घोषितदेखील करण्यात आले होते. या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करून घेण्याबाबत पालिकेकडून पत्राद्वारे कळवण्यात आले होते. त्यानंतर या इमारतीचा काही भाग २७ जूनला कोसळल्याचे निदर्शनास आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य हानी टाळण्यासाठी रहिवास नसलेली ही इमारत पाडून टाकण्यात आली. बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे तसेच उपअभियंता पंढरीनाथ चौडे, कनिष्ठ अभियंता अभय गावीत व धीरेन भोईर, नयन भोईर यांच्या उपस्थितीत ही धोकादायक इमारत पाडण्याची कारवाई करण्यात आली. या वेळी अतिक्रमण विभागाकडील सुरक्षा रक्षक कार्यरत होते. दोन जेसीबींसह एक पोकलेन आणि १० मजुरांच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.