नवीन पनवेल, ता. २९ (बातमीदार) : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध भागांमध्ये बेकायदा गुटखाविक्री करणाऱ्या टपऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. सात ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भिंगारी, पळस्पे, करंजाडे, तक्का, कोळखे या भागांमध्ये पानटपऱ्यांवर खुलेआम गुटखाविक्री होत होती, तसेच शहर हद्दीतील गस्तीवर असताना ओएनजीसी कंपनीच्या गेटच्या बाजूला असणाऱ्या किराणा मालविक्रीच्या दुकानामध्ये एक जण गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने दुकानामध्ये छापा टाकून तेथील माल जप्त केला. इतर भागातही कारवाई करून गुटखा ताब्यात घेतला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अभिजित अभंग, समाधान पाटील, राजपुरे यांनी ही कारवाई केली.