Virat Kohli Nephew: विराटच्या पावलावर पाऊल ठेवण्यास पुतण्या सज्ज! 'या' स्पर्धेसाठी नोंदवला सहभाग; सेहवागची दोन्ही मुलंही...
esakal July 01, 2025 05:45 AM

विराट कोहली भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंमधील एक खेळाडू आहे. आत्तापर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमही केले आहेत. तब्बल ८२ शतके त्याच्या नावावर आहेत. पण आता विराट त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे.

त्याने कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्ती घेतली आहे. पण तो वनडेत अद्याप खेळत आहे. दरम्यान, तो त्याच्या अखेरच्या टप्प्यात असला, तरी आता आणखी एक कोहली क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्यासाठी तयार होत आहे.

Virat Kohli ने 'त्या' घटनेनंतर एबी डिविलियर्सला केलेलं घोस्ट? मिस्टर ३६० ने केला मोठा खुलासा

विराट कोहलीचा १५ वर्षीय पुतण्या आर्यवीर कोहलीही काकाच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटमध्ये नशीब आजमवणार आहे. आर्यवीर हा विराटचा मोठा भाऊ विकास याचा मुलगा आहे. आर्यवीरने आगामी दिल्ली प्रीमियर लीगच्या लिलावात नोव नोंदवलं असून त्याचं नाव शॉर्टलिस्टही करण्यात आलं आहे. आता या लीगचा लिलाव ५ जुलैला होणार आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आर्यवीर फिरकीपटू (Leg Spinner) आहे. तो विराट कोहलीचे लहानपणीचे प्रशिक्षक राज कुमार शर्मा यांच्याकडेच वेस्ट दिल्ली क्रिकेट ऍकेडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्याला सी कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले असून तो दिल्ली क्रिकेटमधील गेल्यावर्षीचा १६ वर्षांखालील नोंदणीकृत खेळाडू होता.

नोंदणीकृत खेळाडू म्हणजे त्यांची संभाव्य ३० जणांच्या संघात निवड झालेली असते. त्यामुळे आता दिल्ली क्रिकेटमध्ये आणखी एक कोहली क्रिकेट गाजवणार का, हे पाहावे लागणार आहे.

Virat Kohli: ... तर विराट कसोटीतून निवृत्तीचा निर्णय मागे घेईल; वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचा दावा सेहवागच्या मुलांचाही समावेश

दरम्यान, केवळ विराटचा पुतण्याच नाही, तर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागचा मुलगा, ज्याचं नावही आर्यवीरच आहे, तो देखील दिल्ली प्रीमियर लीगच्या लिलावात दिसणार आहे. १७ वर्षांचा असलेल्या आर्यवीर सेहवागनेही या लिलावासाठी नोंदणी केली असून त्याचंही नाव शॉर्टलिस्ट झाले आहे.

आर्यवीर सेहवागने १९ वर्षांखालील दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने मेघालयाविरुद्ध २९७ धावांची खेळीही केली होती. त्याला लिलावासाठी बी कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलंय.

इतकंच नाही, तर सेहवागचा धाकटा मुलगा वेदांत देखील या लीगच्या लिलावात आहे. तो देखील बी कॅटेगरीमध्ये आहे. १५ वर्षीय वेदांत ऑफ स्पिनर असून १६ वर्षांखालील संघाकडून खेळला आहे.

यंदा दिल्ली प्रीमियर लीगमध्ये ८ संघ सहभागी होणार आहेत. यात आऊटर दिल्ली, न्यू दिल्ली यांचा समावेश झाला आहे. याशिवाय इस्ट दिल्ली रायडर्स, नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स, वेस्ट दिल्ली लायन्स, साऊथ दिल्ली सुपरस्टार्स, पुरानी दिल्ली ६ आणि सेंट्रल दिल्ली किंग्स या संघांचा समावेश आहे.

गेल्यावर्षी पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेचे विजेतेपद इस्ट दिल्ली रायडर्सने जिंकले होते. या लीगमध्ये प्रियांश आर्य, दिग्वेश राठी हे खेळाडू खेळताना दिसले होते, ज्यांना आयपीएल २०२५ लिलावात खरेदीदार मिळाला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.