ठाणे पालिकेची कोटीची उड्डाण
esakal July 01, 2025 08:45 AM

ठाणे पालिकेची कोटीची उड्डाणे
तीन महिन्यांत ४१९ कोटींची वसुली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : ठाणे पालिकेची डगमगलेली आर्थिक स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे, अशातच पालिकेवर असलेले दायित्वदेखील कमी होत आहे, तर दुसरीकडे पालिकेच्या विविध विभागांनी एप्रिल ते जून या कालावधीत ४१९ कोटींची वसुली केली असल्याची सकारात्मक गोष्ट समोर आली आहे. यामध्ये मालमत्ता करापोटी २९१ कोटी सर्वाधिक वसुली करीत आघाडी घेतली आहे.
यंदा म्हणजेच २०२४-२५ या आर्थिक वर्षात पालिकेने मालमत्ता कर विभागाला ८१९ कोटी ७१ लाख रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर विभागाने १ एप्रिलपासूनच पावले उचलली आहेत. यासाठी पालिकेने करदात्यांपर्यंत लघुसंदेश (एसएमएस) नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविले, तर दुसरीकडे पालिकेने मालमत्ता कराच्या सामान्य करात १० टक्के सवलत दिली. या सवलतीचादेखील ठाणेकरांनी प्रतिसाद देत कर भरणा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जून महिन्यापर्यंत मालमत्ता कर विभागाने २९१ कोटींची वसुली केली आहे.
------------------------------------
अग्निशमनकडून आठ कोटींची वसुली
शहर विकास विभागानेदेखील यंदा चांगली सुरुवात केल्याचे दिसत आहे. या विभागाला ६५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत ८७.३३ कोटींची वसुली झाली आहे. पाणीपुरवठा विभागाने ८.६३ कोटींची वसुली केली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने ६.३० कोटी, अग्निशमन दल ८.३० कोटी, स्थावर मालमत्ता विभाग ०.८९ लाख, घनकचरा ०९ लाख, वृक्ष प्राधिकरण विभाग १.६४ कोटी अशा स्वरूपात विविध विभागांनी वसुली केलेली आहे. ठाणे महापालिकेच्या विविध विभागांकडून २०५० कोटींचे मूळ अंदाजपत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत ४१९.३९ कोटींची वसुली झाली आहे.
...........................

शासनाकडून अपेक्षित अनुदान १२३३.७९ कोटी - मिळालेले उत्पन्न - ३०८ कोटी
स्टॅम्प ड्युटी - २०० कोटी पैकी ९३.१२ कोटी
...........................

पाणीपुरवठा विभाग पिछाडीवर

पाणीपुरवठा विभागाकडून आता दर तीन महिन्यांनी पाण्याची बिले अदा केली जात आहेत. त्यानुसार पुढील काळात वसुली आणखी वाढलेली असेल, असा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. या विभागाला २६२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असून, परंतु पाणीपुरवठा विभाग हा काहीसा पिछाडीवर गेल्याचे चित्र आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.