दादू : (विजयी मुद्रेनं) सदूराया रे सदूराया..!
सदू : (खुशीत) बोल दादूराया! आज स्वारी खुश दिसतेय!
दादू : (भावुक होत) खरं सांगू? रात्रभर झोपलो नाही…
सदू : (चकित होत) काय सांगतोस? मी गाढ झोपलो!!
दादू : (बंधुप्रेमाने) तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्याच्या माळा!!
सदू : (युगुलगीत पुढे नेत) तुज कंठी, मज अंगठी, आणखी गोफ कोणाला?
दादू : (पुढील ओळी न आठवल्याने) आपण दोघं एकत्र येणार या कल्पनेनंच त्यांना घाम फुटला रे!! हाहा!!
सदू : (न कळल्यागत) त्यांना म्हणजे कोणाला?
दादू : (दातओठ खात) ते अभद्र, अमंगळ नाव मी उच्चारत नाही! मोजून त्रेचाळीस चुळा भराव्या लागतात!!
सदू : (भाबडेपणाच्या आविर्भावात) कमळेबद्दल बोलतोयस का तू?
दादू : (कपाळावर हात मारत) कश्शाला घेतलंस त्या कैदाशिणीचं नाव? आता दात घासून पाव किलो बडीशेप खा!!
सदू : (समंजसपणे) एवढा दुस्वास बरा नव्हे! राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो, आणि मित्रही!!
दादू : (संतापातिरेकानं) हेच…हेच ती कमळी मला पंचवीस-तीस वर्ष ऐकवत होती!
सदू : (चिडून स्वत:शीच) हिंदी सक्ती करतायत लेकाचे! वरुन पितरं उतरली तरी असली सक्ती जुमानणार नाही!
दादू : (छद्मीपणाने) ही नादान कमळी कुठल्या शाळेत शिकली कुणास ठाऊक!! आपण दोघं एकत्र येऊ नये म्हणून तिनं किती आकाशपाताळ एक केलं, पाहातोयस ना? आपल्या नावाचा ब्रँड संपवण्याची भाषा करणारे एक झटक्यात संपले!! दे टाळी!!
सदू : (धोरणीपणाने) टाळीचं बघू नंतर! टाळीला वेळ आहे अजून!! सध्या मराठीप्रेमाचा आनंद एकत्रित घेऊ या! आमच्या पक्षात तर जल्लोष सुरु आहे!
दादू : (हिणवत) तुम्ही काय, टोलनाका फोडला तरी जल्लोष करता! आमचं तसं नाही!! टाळी दे आधी!!
सदू : (विषय बदलत) बांदऱ्यात पाऊस कसा आहे? इथं दादरमध्ये ऊन पडलंय!!
दादू : (खोटा खोटा हट्ट करत) टाळी द्यायला टाळाटाळ का करतो आहेस? हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर आपण एकत्र येणार म्हणून महाराष्ट्र किती उत्साहात आला! खरोखर एकत्र आलो तर काय होईल, जस्ट इमॅजिन!!
सदू : (गुळमुळीत) ते खरं रे! पण-
दादू : (निकराने) आता पण नाही नि बिण नाही! मराठी माणसाची ही एकजूट कायम राहिलीच पाहिजे! नव्हे, ते आपलं कर्तव्य आहे…तू आता उगीच आढेवेढे घेऊ नकोस!! हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर आपण त्या कमळेचं चपटं नाक चांगलं चेचलंय ना? मग येत्या निवडणुकीत तिचा पार भुगा करुन टाकू!! ती आणि तिचे ते गद्दार चाळीस चोर!! जुलमी, खोटारडे, विश्वासघातकी!
सदू : (थंडपणाने) हिंदीसक्तीचं घोंगडं तुमच्याच सरकारनं गळ्यात घेतलं होतं, असं म्हणताहेत ते! याला काय उत्तर?
दादू : (खुलासा करत) सगळ्या फायली मी वाचत नव्हतो! मला काय माहीत त्या अहवालात हे असलं षडयंत्र दडलं होतं? मुळात मी फायली बघायला जातच नव्हतो! मी फाइल उघडणार, इतक्यात त्या कमळेनं माझी खुर्चीच काढून घेतली! तिचीच चूक आहे…
सदू : (हसू दाबत) बरं बरं! आता पुढे काय करायचं? विचार करुन ठेवायला हवा!!
दादू : (प्लॅन रंगवत) आधी एकत्र जल्लोषबिल्लोष करु, मग एकमेकांना रीतसर टाळी देऊ! टाळी दिल्यावर मग बघायलाच नको! पुन्हा जल्लोषबिल्लोष! कशी वाटली माझी आयडिया?