टीम इंडियाचे माजी अनुभवी फलंदाज आणि कर्णधार राहिलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी 20i वर्ल्ड कप 2024 नंतर सर्वात छोट्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर या जोडीने काही आठवड्यांपूर्वी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. विराट आणि रोहित ही जोडी आता फक्त वनडे क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहेत. या दोघांनी वनडे क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाला यजमान बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहेत. मात्र या नियोजित दौऱ्याबाबत आता संभ्रम आहे. भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे.
भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार की नाही? याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला बांगलादेश दौऱ्यासाठी केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही.
भारताच्या बांगलादेश दौऱ्याबाबत अजूनही बीसीसीआयने पुष्टी केलेली नाही, अशी माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी दिली आहे. इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरच या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय घेईल.
“माझं बीसीसीआयसोबत बोलणं झालं आहे. आमच्यात बोलणी सुरु आहे. भारत बांगलादेश दौऱ्यावर येईल, याबाबत मला विश्वास आहे. मालिका ऑगस्ट महिन्यात आहे. आता फक्त भारत सरकारची परवानगी मिळणं बाकी आहे”, असंही इस्लाम यांनी नमूद केलं.
भारताच्या बांगलादेश दौऱ्यातील सामन्यांच्या तारखा ठरलेल्या आहेत. त्यानुसार या दौऱ्याला 17 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांचीच टी 20i मालिका नियोजित आहे. मात्र आता बीसीसीायचं सर्व लक्ष हे केंद्र सरकार या दौऱ्याबाब काय निर्णय घेतं? याकडे लागून आहे. केंद्र सरकारने दौऱ्याला ग्रीन सिग्नल दिल्यास एकूण 6 सामने होतील. मात्र रेड सिग्नल दिल्यास एकूण 6 सामने रद्द होतील.
दरम्यान यावेळेस जर दौरा होऊ शकला नाही तर पुढील उपलब्ध विंडोमध्ये आम्ही दौऱ्यावर येऊ, असं आश्वासन बीसीसीआयने दिल्याची माहिती इस्लाम यांनी दिली. मात्र नियोजित दौऱ्याबाबत अनिश्चिततेची स्थिती का आहे? याबाबत माहित नसल्याचंही इस्लाम यांनी म्हटलं.