उन्हवरेत बीएसएनएल टॉवरचा बोजवारा
esakal July 02, 2025 12:45 AM

उन्हवरेतील बीएसएनएल बोजवारा
संपर्क साधण्यात अडथळे; कंपनीविरोधात आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. १ ः दापोली तालुक्यातील दुर्गम अशा उन्हवरे परिसरात गेले काही दिवस बीएसएनएल टॉवरची रेंज गायब झाली आहे. लोकांना संपर्क साधणे फार अडचणीचे झाले आहे. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित उपाययोजना करून कारभारात सुधारणा करावी अन्यथा बीएसएनएल कंपनीविरोधात आंदोलन करू, असा इशारा शिवसेना तालुका उपसंघटक ममता शिंदे यांनी दिला आहे.
उन्हवरे परिसरात रेंज नसल्यामुळे ग्राहकांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता योग्य उत्तर दिले जात नाही. बीएसएनएलसारखी देशातील अग्रगण्य दूरसंचार कंपनी आपला गलथान कारभार कधी सुधारणार असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे. आधुनिक युगात वावरताना बीएसएनएलसारखी मोठी कंपनी जर सर्वसामान्य ग्राहकांना सुविधा देऊ शकत नसेल तर ती काय उपयोगाची? कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांनी आता इतर खासगी मोबाईल कंपन्यांचे सीमकार्ड घेण्यास सुरुवात केली आहे.याचा ग्राहकांना फटका बसत आहे. कारण, खासगी कंपन्यांचे रिचार्जही तितकेच महाग झाले आहे. त्यामुळे बीएसएनएल कंपनीचे ग्राहक कमी झाले तर याचा तोटा बीएसएनएल कंपनीला बसण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. ही कंपनी आता नेटची सुविधा सोडाच साधी रेंजसुद्धा पुरवण्यास असमर्थ आहे. त्यामुळे ग्रामस्थ कंपनीवर प्रचंड नाराज झाले आहेत. उन्हवरे परिसरात बीएसएनएलशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे लोकांना एकमेकांशी संपर्क साधणे शक्य होत नाही. पावसाळा सुरू झाला असून, आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडली तर कोणाला संपर्क साधणेही शक्य होणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन उन्हवरे परिसरातील सेवा सुरळीत करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.