पुणे - दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा येथे कारागृह शिपाई प्रशिक्षणार्थी तुकडी क्रमांक १२२ चा दीक्षांत संचलन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.
अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक (कारागृह व सुधार सेवा) सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन वायचळ आदी या वेळी उपस्थित होते.
तुकडी क्रमांक १२२ मध्ये १९६ प्रशिक्षणार्थींनी यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यात ६३ महिला प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला. परेडचे नेतृत्वदेखील महिला प्रशिक्षणार्थींनी केले. मुख्य कमांडर म्हणून कोयल गौतम, तर सेकंड इन कमांडर म्हणून पायल जाधव यांनी नेतृत्व केले.
या कार्यक्रमास विविध वरिष्ठ तुरुंग अधिकारी, प्राचार्य, अधीक्षक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अतिरिक्त अधीक्षक एच.एस. मिंड, वरिष्ठ तुरुंग अधिकारी शैला वाघ, पी.बी. उकरंडे आणि इतर अधिकारीही उपस्थित होते. सर्व विजेत्यांचा ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रशिक्षण काळात उत्कृष्ट प्रावीण्य मिळवून ‘सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी’चा बहुमान निकिता माने यांनी पटकावला.
विविध विभागांतील अव्वल प्रशिक्षणार्थी -
वर्ग अभ्यासात प्रथम - निकिता माने
नेमबाजी परीक्षेत प्रथम - शुभम देहारे
मैदानी प्रशिक्षणात प्रथम - पंकज पुंड आणि कोयल गौतम
कारागृह विभागातील सेवा ही अतिशय संवेदनशील असली, तरी प्रशिक्षणार्थींनी निष्ठा, शिस्त आणि सेवाभाव या त्रिसूत्रीच्या आधारे आपले कार्य उत्कृष्ट करावे. तुमच्या कार्यातून विभागाचा गौरव होईल आणि तुमचे जीवनमानही उंचावेल.
- सुहास वारके, अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा)