लहान-लहान कृती आणि वृत्ती
esakal July 02, 2025 01:45 PM

- डॉ. सचिन जैन, संस्थापक-संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड

काम, अभ्यास करताना सादर केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, उचललेली पावले आपल्या कामाच्या स्वरूपाला दिशा देतात. जेवढा कमी शब्दांत आपण मत, मुद्दा पटवून देऊ शकतो तेवढे त्याबाबतचे नैसर्गिक व प्रामाणिक ज्ञान आणि कळकळ जाणकार लोकांना दिसून येते.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड. द्रविड भारतीय संघात निवडला गेल्यानंतर पहिल्या ५ डावांमध्ये दुहेरी धावसंख्या गाठू शकला नव्हता. परंतु त्या छोट्याशा खेळीत त्याने त्याचे तांत्रिक ज्ञान आणि क्षमता पटवून दिली. अशा छोट्या संधीचे सोने करायचा प्रयत्न केला पहिजे.

आपले वरिष्ठ, सहकारी आपली वर्तणूक, बारकाईने करीत असलेली कामे, त्यातली सूचकता, नीटनेटकेपणा टिपत असतात. वेळ आली म्हणजे त्याचा योग्य मोबदला देऊन त्याचे सार्थक करतात. या लहान लहान कृतीमधून आपली गुणवत्ता आणि वृत्ती प्रदर्शित होते.

अतिशय सामान्य आणि लहान लहान गोष्टी म्हणजे, ऑफिसमध्ये कुणासाठी दरवाजा उघडणे, सहकाऱ्याची प्रशंसा करणे, मदतीसाठी विचार न करता आपला हात पुढे करणे या गोष्टी खूप प्रभावित करतात आणि यावरून आपले व्यक्तिमत्त्व आणि वृत्ती दिसून येते. यामधून आपण दुसऱ्यांचा किती आदर करतो, सन्मान देतो, हे प्रकट होते आणि आपले सहकाऱ्यांशी, वरिष्ठांशी संबंध सदृढ होण्यास मदत होते.

या कृती लहान असल्या तरी आपल्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवितात आणि आपला ठसा उमटवितात. अर्थात हे आवर्जून आणि नैसर्गिकपणे केले तरच त्याचा प्रभाव आणि परिणाम जाणवेल.

तुमचे छोटेसे भाषण, टिप्पणी किंवा एखाद्याची आवर्जून केलेली प्रशंसा - या गोष्टी आपला वेगळा ठसा उमटवितात.

या लहान-लहान कृती आपल्या लिखाणातून, वागण्यातून, हावभावातून योग्य पद्धतीने दिसतात. त्या वरिष्ठांच्या, तुमच्या सहकाऱ्यांच्या आणि तत्सम प्रत्येक जण जो तुमच्या भविष्य साकारायला मदत करू शकतो त्याच्या नजरेतून सुटत नाहीत.

अनेकदा आपण मोठे काहीतरी करावे, किंवा अमुक एक व्यक्तीस, विषयास फार महत्त्व देतो आणि त्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त परिश्रम घेतो आणि मग त्यात अपयश आले तर त्याचे दुःख आणि नैराश्य आपल्याला ग्रस्त करते.

याउलट या छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यासाठी घ्यावे लागणारे प्रयत्न, परिश्रम फार वेगळे नसतात आणि आपल्या कामात आणि व्यवहारात त्याचे स्वरूप दिसायला लागते आणि सहजपणे पार पडते. हळूहळू त्याचा प्रभाव इतरांवर पडायला सुरवात होते. यशस्वी भविष्यासाठी या लहान लहान गोष्टी करत राहाव्यात. कुणाला तुम्ही फूल किंवा फुलांचा गुच्छ दिला तरी त्याचा तुमच्याबद्दलचा आदर वाढविण्यात मदत होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.