आदरातिथ्याची कला
esakal July 03, 2025 10:45 AM

लग्न, मुंज, सण, समारंभ, धार्मिक कार्यक्रम, यांच्या निमित्ताने घरामध्ये नातेवाईक, पाहुणे खाण्यापिण्याची रेलचेल, गप्पा, हसणे, भेटवस्तूंची देवाण-घेवाण या सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन नाहीत. आपल्यासाठी पाहुणा म्हणजे परमेश्वर आणि त्याचा योग्य पाहुणचार करणे ही आपल्या कुटुंबाच्या संस्कारांची ओळख आहे.

आपण कितीही आधुनिक झालो तरी पाहुणचार करणे ही आपल्या नात्याची गोडी वाढवणारी कला आहे आणि याच कलेला अधिक प्रभावी बनवतो ‘होस्टिंग एटीकेट’ म्हणजेच शिष्टाचारयुक्त समजूतदार पाहुणचार.

होस्टिंग एटीकेट म्हणजे नक्की काय? तर कुठल्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या ठिकाणी, यजमानाने पाहुण्यांची कसे वागावे, कसे आदरातिथ्य करावे आणि कसा त्यांना सुखद अनुभव द्यावा, याचे शिष्टाचार. चांगले यजमान होणे केवळ औपचारिकता म्हणून मर्यादित नसते, तर नातेसंबंध दृढ होतात.

मैत्रिणींनो, काही कार्यक्रमांमध्ये गेल्यावरती अगदी मनापासून स्वागत केले जाते, प्रेमाने विचारपूस केली जाते, वेळच्यावेळी सर्व व्यवस्था केली जाते, अशा ठिकाणी आपल्याला अगदी घरच्यासारखे वाटते. त्या प्रसंगांची, कार्यक्रमांची आठवण कायम मनात राहते.

काही ठिकाणी मात्र, कोणी नीट विचारपूस करत नाही, वेळच्या वेळेला गोष्टी मिळत नाहीत, अगदी उपेक्षा जाणवते आणि अशा वेळेला आपल्याला तो कार्यक्रम लवकरात लवकर सोडावासा वाटतो. यजमानाची भूमिका आणि वागणूक, पाहुण्यांच्या संपूर्ण अनुभवावर परिणाम करते.

होस्टिंग एटीकेटचे पैलू

  • पाहुण्यांचे स्वागत

  • नीटनेटकं आणि सज्ज घर अथवा कार्यक्रमाचे ठिकाण

  • खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था

  • वेळेची जाणीव

  • सर्वांचा समावेश

  • पाहुण्यांची योग्य काळजी

  • कृतज्ञता

मैत्रिणींनो, कोणी घरी येतं, तेव्हा घर, अन्न, सजावटीबरोबर तुमचं वागणं, संवाद, व्यवस्थितपणा हे लक्षात राहतं. आपुलकीने बोलणे, लहानमोठ्यांचे विचारपूस करणे, त्यांच्या पसंतीनुसार काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे, या गोष्टी नातं घट्ट करतात. अगदी आपल्या संस्कृतीनुसार पाहुण्यांना थोडासा जेवायला आग्रह करणे, पाहुण्यांबरोबर बोलायला वेळ काढणे, या गोष्टी आपण पाळणे महत्त्वाचे आहेच; त्याचबरोबर ही कला पुढच्या पिढीकडे देणंसुद्धा आपलं कर्तव्य आहे.

चांगला होस्ट होण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊया.

  • पाहुणे घरी यायच्या आधी थोडंसं नियोजन करणे, वेळेवर सगळं तयार ठेवणे. जेवण, व्यवस्था, संगीत, वातावरणनिर्मिती हे सर्व करत असताना पाहुण्यांची संख्या, त्यांचा वयोगट आणि पाहुण्याची विशेष गरज लक्षात घेणे.

  • हसतमुखाने, ओळख लक्षात ठेवून, स्वागत केल्यास पाहुणा आपुलकीने भारावून जातो. हे करताना लहान मुलांची आणि ज्येष्ठांची जास्त काळजी घ्यावी.

  • पाहुण्यांशी साधलेला संवाद लक्षात राहतो. त्यामुळे सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तो साधताना विनम्रपणे, आपुलकीने आणि समजूतदारपणे साधा.

  • खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था करा. सर्वांना पुरेल, सर्वांच्या सवयी लक्षात घेऊन, मेन्यू तयार करा.

  • कार्यक्रम संपल्यावर पाहुण्यांना आदराने निरोप द्या. वेळ काढल्याबद्दल, भेटवस्तू दिल्याबद्दल कौतुक करा आणि त्यांना परत बोलवा.

मैत्रिणींनो, पाहुणचार म्हणजे चहा कॉफी किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था किंवा घर सजवणे इतकीच नसून, त्यामागे आहे प्रेमसन्मान आणि नात्यांची गुंफण, आपलं वागणं, संवाद, तयारी आणि देखभाल या सगळ्या गोष्टींमधून विश्वास तयार होत असतो. कार्यक्रम कितीही छोटा अथवा मोठा असो आपुलकीने केलेलं स्वागत महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे प्रत्येक वेळी पाहुणचार करताना फक्त घर नाही, तर मन उघडा आणि कायमचे आठवणीत राहणारे क्षण तयार करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.