आदरणीय प्रदेश कमळाध्यक्ष श्री. रा. रवींद्रजी चव्हाणजी यांना शतप्रतिशत नमस्कार. आजपासून तुम्ही ज्या पक्षाध्यक्षपदाच्या खुर्चीत बसणार आहात, त्याच खुर्चीत मी तीनेक वर्ष काढली आहेत. उठताना ती रुमालाने स्वच्छ पुसली आहे. खुर्चीवरुन उठताना माझे पाय (हो…पायच) जड झाले होते.
बराच काळ बसल्याने पायाला (हो…पायालाच) मुंग्या येतात. तशा त्या मला आल्या. पायाचा अंगठा खाजवला की मुंग्या जातात. तुम्हालाही पायाला (हो…पायालाच) मुंग्या येईपर्यंत त्या खुर्चीत बसायची संधी मिळो, हीच सदिच्छा.
सर्वप्रथम तुमचे हार्दिक अभिनंदन! पक्षाच्या सुवर्णकाळात तुम्हाला ही सुवर्णसंधी लाभली आहे. तथापि, तुम्ही बसताय, ती खुर्ची काटेरी असून तिथे अनेक दिग्गज बसून गेले आहेत, याची जाणीव ठेवावी. सर्वश्री ना. स. फरांदेंपासून माझ्यापर्यंत अनेक मोठेमोठ्या नेत्यांनी त्या खुर्चीत बसून काम केले आणि पक्ष वाढवला.
मी तर सामान्य कार्यकर्ता होतो. सायकलीवरुन प्याडल मारत, स्कूटरवर (मागे बसून) हिंडत गावोगाव पक्षसंघटना वाढवण्यासाठी पायपीट केली. माझ्या कारकीर्दीत दोन मोठ्या निवडणुका झाल्या. एक लोकसभेची, दुसरी विधानसभेची. लोकसभेच्या वेळी खूप रडलो, विधानसभेला खूप (मोठ्यांदा) हसलो.
तरीही कधी कुणावर रागावलो असेन, चुकीचे वागलो असेन तर मोठ्या मनाने क्षमा करावी, असे भावनिक पत्र मी कार्यकर्त्यांना पाठवले आहे. तुम्हाला वेगळे लिहितो आहे. कारण तुम्ही नवे आहात. जाता जाता काही सूचना करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. एकप्रकारे हे पक्षकार्यच समजावे.
दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि (फक्त) पक्ष कार्यालयात रवींद्र ही ‘द्र’ची क्रमवारी कायम लक्षात ठेवा. अन्यथा गडबड होईल.
नरेंद्रभाई कुठे भेटून तुमच्याकडे बघून हसले तर सहज हसले असा गैरसमज करुन घेऊ नका. आपले काही चुकले आहे का, हे लागलीच तपासा.
देवेंद्रजी कुणाकडेही बघून हसतात. पण ते रागावले की जास्त हसतात, हेही लक्षात ठेवा.
प्रदेशाध्यक्ष सगळे पक्षाचे निर्णय घेतो, असल्या भलत्या भ्रमात राहू नका. किंबहुना कुठलाच निर्णय प्रदेशाध्यक्ष घेत नाही हे वास्तव एकदा अंगी बाणवले की पुढे प्रॉब्लेम राहात नाही. आपला पक्ष लोकशाही पक्ष आहे. इथे निवडणुका वगैरे शिस्तीत होतात. पण दिल्ली आणि देवेंद्रजी सांगतील तेच आणि तेवढेच करायचे. बाकी लोकशाही वगैरे ठीक आहे.
कुठल्याही पक्षीय बैठकीत तुमचे अनुकूल मत असेल तर(च) ते खुलेपणाने मांडण्याचा अधिकार पक्षाने प्रत्येक कार्यकर्त्याला दिला आहे.
आता तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाला आहात. आपण(ही) सुट्टी टाकून सहकुटुंब परदेशी सहल करुन यावे असे वाटले तर सहलीतील सदस्यांचे फोन काढून घेण्याची दक्षता बाळगावी. संजय राऊत सगळ्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकतात. मुळात अध्यक्षपदी असेतोवर परदेशी वारी करुच नका, असा माझा प्रेमाचा सल्ला आहे.
कशाला हवी ती कटकट? उबाठाच्या लोकांपासून सावध रहा. निवडणुकीत त्यांना पाडणे सोपे असले तरी ते नाही नाही ते लागट बोलतात. मागल्या खेपेला मी वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा की ॲमब्रोजसारखा दिसतो, अशी टीका झाली होती. तुम्हीही कुणासारखे तरी दिसता म्हणून टीका होईल. आपण दुर्लक्ष करावे.
‘पहले देश, फिर दल, अंत में स्वयं’ हे आपल्या पक्षाचे तत्त्व आहे. यात महाराष्ट्र कुठे आहे? असा प्रश्न विचारु नये.
शेवटला मंत्र देतो : ऐकावे जनाचे, करावे देवेंद्रजींच्या मनाचे!
पुन्हा एकदा अनेक हार्दिक शुभेच्छा. चू. भू. द्यावी घ्यावी.
आपला. सी. बी.