पश्चिम आफ्रिकन देश मालीमधील कायेस शहरात अल कायदाने भीषण दहशतवादी हल्ला केला आहे. येथील डायमंड सिमेंट कारखान्यात काम करणाऱ्या तीन भारतीय नागरिकांचे अल कायद्याच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले. यामुळे भारत सरकार चिंतेत आहे. भारत सरकारने भारतीय नागरिकांची तात्काळ आणि सुरक्षित सुटका करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आवाहन माली सरकारला केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १ जुलै रोजी ही घटना घडली.
मंगळवारी काही सशस्त्र हल्लेखोरांनी मालीतील कायेस येथील डायमंड सिमेंट कारखान्यावर हल्ला केला आणि तेथे काम करणाऱ्या तीन भारतीय नागरिकांचे अपहरण केले. अल-कायदाशी संबंधित गट जमात नुसरत अल-इस्लाम वाल मुस्लिमीन (जेएनआयएम) ने मालीमधील या अपहरण आणि इतर हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.
मालीची राजधानी बामाको येथील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासन आणि सिमेंट कारखाना व्यवस्थापनाशी सतत संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच अपहरण केलेल्या भारतीयांच्या कुटुंबियांनाही परिस्थितीची माहिती दिली जात आहे. भारत सरकारने या घटनेला हिंसाचाराचे अत्यंत निंदनीय कृत्य म्हटले आहे. तसेच माली सरकारला भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अपहरण केलेल्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित परत आणण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. सरकारने मालीमध्ये राहणाऱ्या इतर भारतीयांनाही सतर्क राहण्याचे म्हटले आहे. तसेच या भारतीयांना भारतीय दूतावासाच्या नियमित संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे.
मालीच्या पश्चिम भागात लष्करी आणि सरकारी प्रतिष्ठानांवर मंगळवारी दहशतवादी हल्ले झाले. त्याच दिवशी अपहरणाची घटना घडली. इस्लामी बंडखोरी आणि तुआरेग बंडखोरीमुळे २०१२ पासून माली अस्थिर बनला आहे. अलिकडच्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.