लय...नृत्याची आणि जीवनाची!
esakal July 03, 2025 10:45 AM

हा लेख छापून येईल, तेव्हा मी मुंबई-लंडन प्रवासात असणार आहे. तिकडे जाण्याचं कारण म्हणजे युरोपियन मराठी संमेलनात आम्ही आमचा ‘लाभले आम्हास भाग्य’नावाचा कार्यक्रम घेऊन जातो आहोत. ज्या देशाने आपल्यावर अनेक वर्ष राज्य केलं, त्या देशामध्ये जाऊन आपल्या लेखकांनी लिहिलेले विचार, अस्खलित मराठीमध्ये तीन-साडेतीन तास सादर करण्याची संधी कोण सोडेल!

मजेचा मुद्दा सोडून देऊ, परंतु खरोखरच अशा कार्यक्रमांमुळे जिभेवर साचलेला बोलण्यातला आळस पूर्णपणे धुतला जातो. कित्येक काळ नुसते ‘मनामध्ये’ रुंजी घालणारे शब्द ‘लोकांसमोर’ सादर करण्याची संधी मिळते.. आणि थोरामोठ्यांनी लिहून ठेवलेले विचार आपल्यामार्फत लोकांपर्यंत पोहोचणे याहून दुसरं सुख नाही.

या कार्यक्रमाचा विषय काढण्याचे कारण म्हणजे ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या ‘जोगिया’ या कवितेवर मी नृत्य सादर करणार आहे. मला कथक करण्याची संधी मिळते, तेव्हा मी ती सोडत नाही. ती फक्त सादरीकरणाची संधी नसते... ती संधी पुन्हा एकदा मला माझं आधीच आयुष्य जगाला मिळतं, ही असते!

मुंबईमध्ये आम्ही त्या कवितेचं रेकॉर्डिंग करत होतो, तेव्हा तबला वाजायला लागला, पेटीवरती लेहरा सुरू झाला आणि घुंगरांचे आवाज मात्र मला माझ्या ताईंच्या क्लासमधले यायला लागले. माझ्या गुरू म्हणजे पंडिता मनीषाताई साठे. एरवी माझ्या आयुष्यामध्ये ताईंचं नाव घेतल्यानंतर किंवा ताईंशी बोलताना जे होतं तेच या क्षणीसुद्धा झालं. मी पूर्णपणे स्तब्ध होऊन जाते. ताईंचं माझ्या आयुष्यातलं आणि करिअरमधलं स्थान खूप मोठं आहे..

ताईंबद्दलची माझी पहिली आठवण ही थेट मी सहावीत असतानाची आहे. तेव्हा मी अर्चना पटवर्धनांकडे शिकायला होते. अर्चनाताई मनीषाताईंच्याच शिष्या. मनीषा नृत्यालयाचा गुरुपौर्णिमेनिमित्त वर्षातून एकदा मोठा कार्यक्रम होतो, त्यामध्ये स्वतः मनीषाताई तर सादरीकरण करतातच; पण त्याचबरोबर त्यांच्या सगळ्या विद्यार्थिनी आणि त्यांच्याही विद्यार्थिनी असा तो मोठा समारंभ असतो.

आमची प्रवेशिका प्रथमची बॅच होती. सुरवंटाचं फुलपाखरू होतं, हा विषय घेऊन अर्चनाताईंनी नृत्यनाटिका बसवली होती. अर्चनाताईंची आम्हाला सक्त ताकीद असायची, की काहीही झालं तरी ताईंसमोर चुकायचं नाही. त्यामुळे मनीषाताईंबद्दल आदरयुक्त धाक हा अगदी लहानपणापासूनच होता. काही कारणांनी मनीषाताईंनी आमची तालीम पाहिली नाही.

थेट कार्यक्रमाच्या दिवशी त्या पहिल्या रांगेत त्यांच्या ठरलेल्या जागेवर बसलेल्या दिसल्या. मला वाटतं मी अख्खा नाच त्यांच्याकडे बघतच पूर्ण केला. ‘तेजस्वी’ या शब्दाची पहिली ओळख मला ताईंच्या चेहऱ्यामधून झाली. कार्यक्रम झाल्यानंतर घरी जाण्याच्या आधी मनीषाताईंना नमस्कार करायला आम्ही सगळ्याजणी गेलो, ताईंच्या पायांना मी ओझरता स्पर्श केला आणि त्यांनी डोक्यावर हात ठेवून ती ‘छान होता हा सुरवंट’ असं म्हटलं आणि ‘आभाळ ठेंगणं’ हा वाक्प्रचार तेव्हा कळला..

मध्यमा पूर्णची परीक्षा झाल्यानंतर, विशारदसाठी आम्ही मनीषाताईंकडे शिकायला गेलो. शाळा शिकून कॉलेजमध्ये पाऊल ठेवताना जी भावना असते तशीच होती हुरहूर, भीती.. त्यांच्या विद्यार्थिनी भरपूर होत्या.. आपण ताईंचे नाव राखू ना. आपण त्यांची लाडकी विद्यार्थिनी बनू ना आणि त्याहून महत्त्वाचं आपण कधीतरी त्यांच्यासारखं नाचू शकू ना? अनंत प्रश्न डोक्यामध्ये रुंजी घालत होते.

त्यांच्या विशारदच्या बॅचबरोबर आता मला शिकायचं होतं. पहिल्याच दिवशी ताईंनी एक तोडा शिकवला. तो शिकल्यानंतर काही काळ तालीम झाल्यावर त्यांनी प्रत्येकीला तो नाचून दाखवायला लावला. नृत्यांमध्ये आनंद घेता आणि देता आला पाहिजे हे त्या शिकवत होत्या. सगळ्याजणी नाचत होत्या; पण नाचताना कोणी हसत नव्हतं.

तुम्ही चेहऱ्यावरसुद्धा नृत्य दाखवलं पाहिजे असं ताई सांगत होत्या, म्हणून त्यांनी तोडा – एकेकीला करायला लावला. मी थरथरत त्यांच्यासमोर उभी राहिले. मी कथक करायला लागते तेव्हा काही काळानंतर आजूबाजूचं सगळं विरघळून गेलेलं असतं.

मला जर कोणी विचारलं, की मला सगळ्यात शांत सगळ्यात आनंदी कधी वाटतं तर मी कायम एकच उत्तर देईन – जेव्हा पायात घुंगरं बांधली जातात आणि ठेका आणि लेहरा चालू होतो...त्या नादामध्ये मला मी सापडते.. स्वतःचं अस्तित्व जाणवायला लागतं.

एका भलत्याच जगाशी नाळ जोडली जाते.. हे सगळं आत्ता शब्दांमध्ये सापडतय पण तेव्हा ‘पोटात बरं वाटतं’ एवढेच करण्याचं वय होतं. तर, मी तो तोडा सादर केला.. आणि ताई टाळ्या वाजवत ओरडत उठल्या...‘हिच्या चेहऱ्यावरती जे आहे ना ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसलं पाहिजे.. नृत्याचा आनंद घ्या तू चेहऱ्यावर दिसू द्या..’ झालं.. मी पूर्णपणे हवेत गेले...

त्या क्षणापासून आजतागायत तालाच्या पहिल्या मात्रेपासून माझ्या चेहऱ्यावरती हसू असतं.. आपल्या गुरूकडून प्रोत्साहन मिळावं याहून भारी जगात दुसरं काहीच नसतं.. ज्यांनी ज्यांनी ही गुरुशिष्य परंपरा अनुभवली आहे त्यांनाच हे कळू शकतं...

ताईंकडे गेल्या क्षणापासून एकच ध्यास होता.. ताईंसारखा अभिनय जमला पाहिजे, ताईंसारखी लय अंगात आली पाहिजे. ताई स्टेजवर गेल्या, की त्यांच्यावर नजर खिळून असायची.. त्यांना बघताना, या जगात त्या सोडून दुसरे कोणी नाहीच असं वाटत राहायचं.. आपणही स्टेजवर गेलं, की आपल्यावरही अशीच नजर खिळून राहिली पाहिजे हा ध्यास होता मनात...

माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि ताईंचा सहवास सुटला.. कथक मागे पडलं.. कुंकू सुरू झालं.. मला आठवतंय मालिकेचा एक सीन होता ज्यामध्ये मला नरसिंहरावांकडे (सुनीलदादाकडे) बघून लाजायचं होतं.. मी तो अगदी सहज केला.. आणि आमचा दिग्दर्शक जोरात ओरडला, ‘काय सुंदर लाजतेस ग तू.. आजकालच्या बाकीच्या नट्यांना बाकी सगळं येतं; पण छान लाजता मात्र येत नाही..’

माझ्या डोक्यात पहिला विचार ताईंचा आला.. लाजणं मी ताईंकडून शिकले. आजही थकलेली, वैतागलेली असते त्या डोक्यामध्ये पहिला विचार येतो की सरळ पळत पळत ताईकडे जावं.. घुंगरू बांधावेत.. आणि रियाजाला सुरुवात करावी.

ताईंसमोर कधी एवढं घडाघडा बोलू नाही शकले, त्यांना मनातले सांगू नाही शकले... अजूनही सांगू नाही शकत.. कधी कधी लेख वाचून त्यांचा फोन येतो.. एखादं काम आवडलं तरी आवर्जून फोन येतो.. पण ताई तुम्ही मला खूप खूप आवडतात आणि माझ्या आयुष्यात तुमचं खूप महत्त्वाचं स्थान आहे.

फक्त मलाच नाही तर माझ्यासारख्या अनेकींना तुम्ही फक्त कलाकार म्हणून नाही, तर माणूस म्हणून घडवलं.. आणि या सगळ्याच्या बदल्यात गुरुदक्षिणा म्हणून फक्त ताल आणि लय मागितलीत.. तुम्ही आमच्या असण्याचा अविभाज्य भाग आहात.

हे काही मी त्यांच्यासमोर उभं राहून घडाघडा बोलू शकले नाही.. कदाचित म्हणूनच या लेखाचा प्रपंच... आणि कदाचित प्रत्यक्षात नाही; पण निदान कथक करायला लागल्यावर कुठेतरी मनामध्ये त्यांची भेट होत राहते.. म्हणून जिथे संधी मिळेल तिथे मी कथक करत राहते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.