आजची तिथी : विश्वावसु संवत्सर श्रीशके १९४७ आषाढ शु. प्रतिपदा.
आजचा वार : ट्यूसडेवार.
आजचा सुविचार : वाहवा, वाहवा चेंडू हा । सुंदर कितितरी खचित अहा। तुम्ही फेका, तुम्ही झेला । अम्ही फेकू, अम्ही झेलू ।।
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) कुणी एकत्र यावे किंवा दूर व्हावे, यासंदर्भात काही जीआर काढलेला आहे की नाही, याची चौकशी केल्यानंतर मी आता ठामपणाने सांगू शकतो की असा कुठलाही शासननिर्णय जारी झालेला नसून महाराष्ट्रात कोणीही एकत्र येऊ शकते.
एकत्र या असा जीआर नाही, आणि दूर व्हा असाही नाही! दोघांनी एकत्र आल्याने जमावबंदीचा आदेशही अबाधित राहात असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. महाराष्ट्रात खुशाल कुणीही एकत्र यावे. क्रिकेट, हॉकी किंवा बॅडमिंटन खेळावे, असा खुलासा मी कालच केला आहे.
आमचे माजी परममित्र उधोजीसाहेब आणि त्यांचे चुलतबंधू शिवाजीपार्कवाले साहेब यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्ही पामर कोण त्यांना अडवणार? या, बाबांनो एकत्र!! एकत्र जेवा. क्रिकेट खेळा, हॉकी खेळा!
दोघांनी एकत्र येऊन क्रिकेट किंवा हॉकी खेळता येत नाही. कारण हे खेळ सांघिक आहेत. दोन्ही बाजूंना मिनिमम अकरा खेळाडू हवेत. दोघांनाही अकरा-अकरा प्लेअर जमवता आले तर खेळा क्रिकेट किंवा हॉकी! आमचे काय जाते? तूर्त या दोघांनी बॅडमिंटन किंवा टेनिसचा आनंद घ्यावा, असा माझा त्यांना सल्ला आहे. कारण गेल्या काही निवडणुकांचा हिशेब केला तर अकरा-अकरा प्लेअर जमा करणे कठीण जाऊ शकेल!!
क्रिकेट नाहीच जमले तर दोघांनी एक चेंडू घेऊन क्याच-क्याच खेळायलाही काही हरकत नाही. यात वेळ बरा जातो आणि क्याच प्रॅक्टिसही चांगली होते. हिंदीचा आम्ही फुलटॉस दिला नसता तर यांनी काय केले असते? नकोच ते बेभरवशी क्रिकेट त्यापेक्षा रमी खेळलेली बरी. घरच्या घरी डाव मांडता येतो. कुठे जायला नको, नि यायला नको!
‘शिवतीर्था’वर जाऊन जेवून येण्याचे भाग्य मला दोन-चारवेळा लाभले आहे. तसा मी एकेकाळी ‘मातोश्री’वरही जेवून आलो. (तसे बरेच जण तिथे जाऊन ढेकर देत परत आले आहेत!) परंतु, या दोघांसोबत एकत्र पंगत जमवण्याचे भाग्य काही अद्याप मला लाभलेले नाही. लाभेल, लाभेल! राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. पण भोजनभाऊ असू शकतात.
या दोघा बंधूंमध्ये बंदकी व्हावी, हा जणू काही आमचाच डाव आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे. पण हे फेक नॅरेटिव आहे, हे मी जगाला ओरडून सांगेन. कारण या दोघांनी एकत्र यावे ही अवघ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. किंबहुना हिंदीसक्तीचा विषय नाही म्हटले तरी आमच्या थोडा अंगलट आला हे खरे. पण काही हरकत नाही. किंबहुना आमच्यामुळेच आज एकत्र येण्याची संधी त्यांना मिळते आहे, हे त्यांनीही मोठ्या मनाने मान्य करायला हवे.
पुढेमागे हे दोघेही खरोखर एकत्र आले तर ते हिंदीमुळे आले, असेच म्हणावे लागेल. हिंदी भाषेबद्दल थोडी तरी कृतज्ञता असली तर हिंदीसक्तीला असलेला विरोध त्यांनी भविष्यात मागे घ्यावा. कारण याच भाषेमुळे एक दशकांचे वितुष्ट संपले, याची तरी इतिहासात नोंद होईल. ‘हिंदी-चिनी भाई भाई’ या घोषणेच्या चालीवर ‘मराठी-हिंदी माय-मावशी’ अशी नवी घोषणा जन्माला आली तर आश्चर्य वाटायला नको.