- मृदुला अडावदकर, सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
एखाद्या गोष्टींमध्ये आपल्याला पारंगत होण्यासाठी आयुष्यातले दहा हजार तास त्यासाठी समर्पित करावे लागतात. आता हे दहा हजार तास आपण केव्हा सुरू करायचे?
पुढच्या आयुष्यात नेमकं कोणतं करिअर निवडायचं याचा निर्णय काही जण शालेय आयुष्यातच घेतात. आणि पूर्णपणे त्या विषयाला वाहून घेतात. सर्वांगीण विकास हे ध्येय ठरवून औपचारिक शिक्षणातून अनेक गोष्टी शालेय वयातच विद्यार्थ्यांना शिकवण्याचा घाट घातला जातो. जेणेकरून ते सर्व गुणसंपन्न व्हावे, असा ‘होलिस्टिक’ दृष्टिकोन शिक्षणाच्या बाबतीत ठेवलेला असतो.
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील विद्यार्थ्यांच्या पंचकोश विकासाचा विचार केलेला आहे आणि त्या दृष्टीने ‘होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड’ अशी नवीन मूल्यमापन पद्धतीसुद्धा आणली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे तसे अधिकृत आदेशही निघाले आहेत.
वेगवेगळे टप्पे ठरले आहेत आणि त्यानुसार नवीन अभ्यासक्रम नवीन इयत्तांचे टप्पे या सगळ्यांची मांडणी सुरू झालेली आहे. या नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांची भूमिका नेमकी काय आहे? आणि पूर्वीपेक्षा ती कशी वेगळी झाली आहे? या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. म्हणजे एक प्रकारचं विद्यार्थी प्रशिक्षणच म्हणाना!
नाहीतर काय होईल, नवीन पुस्तक नवीन अभ्यासक्रम शिक्षकांच्या शिकवण्याच्या नव्या नव्या पद्धती या सगळ्या नेम धरून मुलांवर आदळल्यासारख्या होतील आणि मग आता पूर्वीचं काय काय टाकायचं आणि काय ठेवायचं? तसंच नवीन दृष्टिकोन कसा आत्मसात करायचा असा गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनात होणे साहजिक आहे.
शाळेपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत शिक्षणाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या करिअरची पायाभरणी कशी करायची, या इतक्या मोठ्या काळाचा वापर आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि करिअरसाठी कसा करून घ्यायचा याबद्दल महत्त्वाच्या टिप्स विद्यार्थ्यांना आणि पालकांना या सदरातून देणार आहोत.
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून सुरू झालेला हा औपचारिक शिक्षणाचा प्रवास थेट अठराव्या वर्षापर्यंत आणि कधी कधी त्याही पुढे सुरू राहतो. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात तर जुनं शिकलेले विसरणं आणि नवीन कौशल्य लगेच शिकून घेणे ही प्रक्रिया आयुष्यभर सुरूच राहणार आहे.
किंबहुना एकविसाव्या शतकात तेच महत्त्वाचे कौशल्य मानले गेले आहे. म्हणजे सतत विद्यार्थी राहणं हीच आता काळाची गरज आहे. शालेय आयुष्यात तर वेगवेगळ्या भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, संगीत इत्यादी विषयांची मोट बांधलेली असते.
या विषयांचा अभ्यास का करायचा? आणि हे विषय शिकत असताना त्यातून करिअरसाठी महत्त्वाचे असणारे गुण कसे आत्मसात करायचे ते आपण जाणून घेणार आहोत. शाळेच्या परीक्षेत तुम्हाला भरभरून गुण नाही मिळाले तरी करिअरच्या प्रवासात महत्त्वाचे असणारे गुण तुम्ही मिळवलेत तरी यशस्वी झालाच म्हणून समजा!