सरदार नावजी बलकवडे यांनी आषाढ शुद्ध अष्टमीला सिंहगड पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला. यानिमित्ताने पदाती सप्तसहश्री सरदार नावजी बलकवडे पुरस्काराचे वितरण गुरुवारी (ता. ३) होत आहे. त्यानिमित्त....
- पांडुरंग बलकवडे
छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात औरंगजेबाच्या मोगल फौजेने राजधानी रायगड, राजगड, पुरंदर आणि सिंहगडासारखे स्वराज्यातले महत्त्वाचे किल्ले जिंकून घेतले होते. अशा संकटसमयी छत्रपती राजाराम महाराजांना स्वराज्यापासून शेकडो मैलावरील दक्षिणेतील जिंजीच्या किल्ल्यावर आश्रयाला जावे लागले होते. अशा विपरीत परिस्थितीत पदाती सप्तसहश्री सरदार नावजी बलकवडे यांनी पराक्रमाची शर्थ करून लोहगड, कोरीगड व सिंहगड हे किल्ले जिंकून पुन्हा स्वराज्यात आणले. तसेच जंजिरेकर सिद्दीचा कुर्डुघाटात आणि मुघल सरदार मन्सूरखान बेग याचा पौड खोऱ्यातील जांभुळने येथे दारुण पराभव केला व स्वराज्याची मोठी सेवा केली.
नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपले बलिदान देऊन माघ शुद्ध नवमी १६७० या दिवशी कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणला. पुढे सिंहगड पुन्हा मुघलांनी जिंकून घेतला होता. तो सरदार नावजी बलकवडे यांनी आषाढ शुद्ध अष्टमीला म्हणजे, १ जुलै १६९३ रोजी पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला. सरदार नावजी बलकवडे यांच्या या सिंहगड विजयाचे कौतुक करण्यासाठी ३ एप्रिल १६९४ रोजी पाठवलेल्या पत्रात छत्रपती राजाराम महाराज लिहितात, ‘‘सिंव्हगड तो मोठी आश्रफाची जागा, त्यासाठी पूर्वी सुभेदार तान्हाजी मालुसरे यांसारखे पराक्रमी मोठे सरदार खर्च होऊन गेले. तुम्ही किल्ले सिंव्हगडाचे कार्यसिद्धीसमयी प्रथम धारेस चढून तरवारीची शर्थ केली व पुढेही कार्य प्रयोजनात तत्पर आहात, या कार्याबद्दल तुम्हांस मौजे सावरगावतर्फे पवन मावळ हा गाव इनाम दिला असे ते स्वामी चालवितील ये विषयी समाधान असू देणे.’’
सरदार नावजी बलकवडे यांचे स्वराज्यासाठीची कामगिरी आणि पराक्रम यापुढेही असेच सुरू होते. नावजी बलकवडे यांच्या या सिंहगड विजयास १ जुलै २०२५ रोजी तारखेने व तिथीने आषाढ शुद्ध अष्टमीस म्हणजेच आज (ता. ३) ३३३ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने आज सायंकाळी ५.३० वाजता पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पदाती सप्तसहश्री सरदार नावजी बलकवडे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले आहे. भारतीय सैन्यदलातील मोलाची कामगिरी करणारे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस यांना ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर भूषविणार आहेत.