- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
‘Dreams are exactly what I’m living currently. I couldn’t have asked for anything different than the present.’
- रूपाली सामंत, creator, designer and marketer at Choc Le’
इतरांनी तुमचे करिअरचे क्षेत्र ठरवण्याऐवजी, तुम्हीच तुमची स्वप्ने योग्य त्या वयात व योग्य वेळी बघितलीत आणि प्रत्यक्षात आणण्याचे ठरवावे. आत्मविश्वासाने त्या स्वप्नांचा पाठलाग करणे, तज्ज्ञांचे
मार्गदर्शन घेऊन योग्य नियोजन केल्यास अशक्य काहीच नसते, याचा साक्षात्कार तुमचा तुम्हाला होईल.
यासाठी एक प्रत्यक्षात घडलेली एक घटना सांगतो. एके दिवशी, शाळेत वर्गशिक्षकाने विद्यार्थ्यांना एक निबंध लिहायला सांगितला. विषय होता, ‘तुम्ही मोठेपणी काय होणार? तुमच्या स्वप्नाबद्दल लिहा.’ एका मुलाने लिहिले, माझे, २०० एकरावर सुंदर फार्म हाऊस असेल आणि मी आंतरराष्ट्रीय ख्यातीचा अश्वपालक आणि प्रशिक्षक असेल.
तो मुलगा जवळपास सात पानांचा निबंध लिहितो. सोबत त्याचं स्वप्न नेमके प्रत्यक्षात उतरले तर कसे दिसेल, याचे सुंदर चित्रही काढतो. तो जाम खूष होतो स्वतःवर. परंतु शिक्षक त्या निबंधाला ‘फेल’ असा शेरा देतात आणि वर समजून सांगतात की. ‘अरे प्रत्यक्षात येईल असे स्वप्न रंगवावे. त्यात तुझी कौटुंबिक परिस्थितीही ठीक नाही. तू वास्तव निबंध लिहिलास तर तो शेरा मी बदलून देईन.’
तो खट्टू होऊन घरी जातो. वडिलांना शेरा दाखवतो. वडील त्याला नाऊमेद न करता सांगतात, ‘बेटा हे तुझं आयुष्य आहे. काय निवडायचे ते तुझे तू, जबाबदारीने निवड.’ शाळेत जाऊन तो शिक्षकांना सांगतो मला नापासाचा शिक्का चालेल. मी माझे स्वप्न नाही बदलणार. वर्षे सरली.
अत्यंत मेहनतीने आणि आत्मविश्वासाने, त्याने त्याचे स्वप्नातील घर उभे केले आणि त्यामध्ये नापासाचा शिक्का बसलेला निबंध फ्रेम करून लावला. हाच तो २०० एकराचा मालक असलेला आणि जगप्रसिद्ध अश्व प्रशिक्षक म्हणून पुढे नावारूपास आलेला मॉन्टी रॉबर्ट्स. लोक तुमच्या विद्यमान अवस्थेवर आधारित मते व्यक्त करतील. तुमची बलस्थाने तुम्हाला माहिती असल्यास अत्यंत आत्मविश्वासाने तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करून ती सत्यात साकारताना पहाल.
भारतीय परिप्रेक्षात तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणे सापडतील. कोणतेही क्षेत्र घ्या, त्यात लहानपणी पाहिलेले स्वप्न, अत्यंत जोमाने आणि आत्मविश्वासाने स्वतःच्याच हयातीत पूर्ण करणारे अनेक यशस्वी व्यक्तिमत्त्व तुम्हाला आढळतील. डॉ. विक्रम साराभाई, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ. जयंत नारळीकर, कितीतरी नावे सांगता येतील.
अशा व्यक्तींचा मागोवा घ्या. त्यांच्या यशाचे गमक शोधण्याचा प्रयत्न करा. पालकांना विनंती, पाल्याला नाऊमेद करू नका. त्यांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय निश्चित करण्यासाठी आणि मिशन स्टेटमेंट लिहून काढण्यासाठी मदत करा.
हे मिशन स्टेटमेंट म्हणजे नक्की काय? ते कसे लिहायचे? बघुयात पुढच्या काही लेखांमध्ये.