सोलापूर विमानतळ परिसराची संयुक्त पाहणी! आढळली 2 कुत्री, चिकन- मासांचे तुकडे, शिळे अन्न अन् कचऱ्याचे ढिग; विमानतळाच्या भिंतीला 2 ठिकाणी भगदाड
esakal July 02, 2025 05:45 AM

सोलापूर : सोलापूर विमानतळाच्या आतील बाजूची स्वच्छता, भगदाड बुजवून सुरक्षाभिंत मजबूत बनविणे, अंतर्गत स्वच्छता, विमानतळाच्या भिंतीलगतची मांस विक्रीची दुकाने, कत्तलखाने व खाद्यपदार्थांच्या दुकानांचे अतिक्रमण काढणे ही जबाबदारी पूर्णत: विमानतळ प्राधिकरणाची आहे. महापालिका प्रशासन सहनियंत्रक म्हणून कामकाज पाहणार आहे. या पार्श्वभूमीवर आता विमानतळ प्राधिकरणाकडून मांस विक्रेते, कत्तलखान्यांसह इतर अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्यात येणार आहे. दरम्यान दोन महिन्यांसाठी स्वच्छतेसह इतर कामाची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे.

होटगी रोड विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिका, जिल्हा प्रशासन, विमानतळ प्राधिकरण, पोलिस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी पाहणी करण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य व्यवस्थापक श्री. वंजारा, उपव्यवस्थापक अंजनी शर्मा, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे, नियंत्रण अधिकारी तपन डंके उपस्थित होते. प्रारंभी विमानतळ परिसराची अधिकाऱ्यांकडून तीन तास पाहणी करण्यात आली. यावेळी अनेक ठिकाणी पाणी साचले होते. दोन कुत्रे आढळले. तेथील सुरक्षेच्यासंदर्भात असलेल्या समस्यांचा निपटारा करण्याच्या सूचना विमानतळ प्राधिकरणाला देण्यात आले. त्यात प्रामुख्याने विमानतळाच्या भिंतीलगत असलेले मांसाची दुकाने, कत्तलखाने व खाद्यपदार्थ विक्रेते या अतिक्रमणधारकांना महापालिकेकडून नोटीस बजाविण्यात येणार आहे. या पाहणीत सुचविण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी दर १५ दिवसांनी संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय यावेळी झाला.

महापालिकेचे अधिकारी म्हणतात...

  • पाणी, ड्रेनेज मूलभूत सुविधांची जबाबदारी आमची

  • विमानतळाच्या आत साचलेले पाणी, वाढलेले गवत, सुरक्षाभिंतीला पडलेले भगदाड बुजविणे ही जबाबदारी विमानतळ प्राधिकरणाची

  • विमानतळाच्या सुरक्षाभिंतीबाहेर फिरणारे मोकाट जनावर, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम ही आमचीच जबाबदारी

पाहणीत काय आढळले

  • दोन कुत्रे

  • चिकनसह इतर मांसाचे तुकडे

  • शिळे अन्न व कचरा

  • गवत व साचलेले पाणी

  • दोन ठिकाणी सुरक्षा भिंतीला भगदाड

अधिकाऱ्यांनी केल्या ‘या’ सूचना...

  • अतिक्रमणधारकांना विमानतळ प्राधिकडून नोटीस द्यावी

  • नागरिकांनी पाडलेली सुरक्षा भिंत बांधून बंद करावी

  • महापालिकेने ट्रॅप लावून सर्वच कुत्र्यांना बाहेर काढावे

  • विमानतळाअंतर्गत पुरेशा प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत

  • महापालिकेची यंत्रणा लावून काटेरी गवत काढून घ्यावे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.