मुंबई - राज्य शिक्षण मंडळाच्या शालेय अभ्यासक्रमातील प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्ती रद्द करण्यात आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेचा राजकीय पक्ष विरहित संयुक्त मेळावा शनिवारी (ता. ५) आयोजित केला आहे.
वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुल (एनएससीआय डोम) येथे हा सकाळी १० वाजता हा मेळावा पार पडणार असून वाजत गाजत गुलाल उधळत या मेळाव्याला, या असे संयुक्त निमंत्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मराठी माणसाला देण्यात आले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची ही नांदी समजली जात असून राज्याच्या राजकारणातील ही अभूतपूर्व घटना म्हणून पाहिले जात आहे.
पहिलीपासून हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतल्यानंतर विरोधी पक्षांनी एकत्र येत येत्या पाच रोजी पुकारलेला मोर्चा मागे घेतला. मात्र हा मोर्चा रद्द झाल्यानंतर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल १८ वर्षांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एका व्यासपीठावर दिसणार आहेत.
दोन्ही पक्षांनी पहिल्यांदाच संयुक्त निवेदनाद्वारे मराठी जनतेला या मेळाव्यासाठी निमंत्रित केले असून निमंत्रणाखाली दोघांचेही नाव आहे.‘‘मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवले का? तर हो नमवले. कोणी नमवले तर हे तुम्ही, मराठी जनांनी नमवले. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करीत होतो,’ असे या निमंत्रणात दोघांकडूनही अधोरेखित केले आहे.
जल्लोष करण्यासाठी, वाजत गाजत, जल्लोषात, गुलाल उधळत या, आम्ही वाट बघतोय, असे संयुक्त आवाहन केले आहे. या पत्रकात राज ठाकरे यांचे नाव उद्धव ठाकरे यांचे आधी असून दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून हे निमंत्रण ‘एक्स’वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. संजय राऊत यांनी हे निवेदन पोस्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे.
तयारीसाठी संयुक्त बैठका
मेळाव्याच्या तयारीसाठी ठाकरे यांची शिवसेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकाही होत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. या क्रीडा संकुलाची पाहणीही पदाधिकाऱ्यांकडून संयुक्तरीत्या करण्यात आली.