वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अर्थात चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड, वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका-बांग्लादेश कसोटी सामने पार पडले. या सामन्यानंतर गुणतालिकेत वर खाली होताना दिसत आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेचं चित्र बदलताना दिसत आहे. चौथं पर्व सुरु असताना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात कसोटी सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने झिम्बाब्वेला नमवलं. पण त्यांना गुणातालिकेत काहीच फायदा झाला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणातलिकेत त्यांना शून्य अंकांसह कायम राहावं लागलं आहे. कारण असं की, झिम्बाब्वे हा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग नाही. त्यामुळे या सामन्याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर काही एक फरक पडला नाही. एकूण नऊ संघ या स्पर्धेत खेळत आहे. यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, बांग्लादेश, भारत, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघाचा भाग आहे. हे संघ जेव्हा एकमेकांशी खेळतील तेव्हाच गुणतालिकेवर फरक पडेल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या गुणातालिकेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे या दोन्ही संघांची विजयी टक्केवारी ही 100 आहे. तर श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची मालिका 1-0 ने सुटली. ही मालिका श्रीलंकेने खिशात घातली. त्यामुळे श्रीलंका तिसर्या क्रमांकावर असून विजयी टक्केवारी 66.67 टक्के आहे. तर बांगलादेशची विजयी टक्केवारी ही 16.67 टक्के आहे. तर भारताने पहिलाच सामना गमवल्याने विजयी टक्केवारी शून्य आहे.
दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण अफ्रिकेने 9 गडी गमवून 418 धावा केल्या आणि डाव घोषित केला. या धावांचा पाठला करताना झिम्बाब्वेचा संघ 251 धावांवर सर्व बाद झाला. दक्षिण अफ्रिकेकडे पहिल्या डावात 167 धावांची आघाडी होती. या धावांच्या पुढे खेळताना दक्षिण अफ्रिकेने 369 धावा केल्या. यासह आघाडी आणि दुसऱ्या डावात केल्या धावांची बेरीज करून 536 धावा केल्या. तसेच विजयासाठी 537 धावांचं आव्हान दिलं. मात्र हे आव्हान गाठताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 208 धावांवर गारद झाला आणि दक्षिण अफ्रिकेने हा 328 धावांनी सामना जिंकला.