वसंतराव नाईक यांना
रत्नागिरीत अभिवादन
रत्नागिरी ः महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
‘सबलीकरण
योजनेत अर्ज करा’
रत्नागिरी ः महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांना १०० टक्के अनुदानावर (मोफत) शेतजमीन उपलब्ध करून देण्याबाबतची कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकाच्या दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबाला जमीन उपलब्ध करून देण्यात येते. इच्छुक पात्र अर्जदाराने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, कुवारबांव, येथे अटींची पूर्तता करणारे पुराव्यासह संपर्क साधून अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे. या योजनेंतर्गत अनु.जाती व नवबौद्ध घटकाच्या दारिद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबाला जमीन उपलब्ध करून देण्यात येते. ४ एकर कोरडवाहू (जिरायती) जमीन किंमत कमाल ५ लाख रुपये प्रती एकर किंवा २ एकर ओलिताखालील (बागायती) जमीन ८ लाख रुपये प्रती एकर अपेक्षित आहे.
रत्नागिरीत ७ ला
लोकशाही दिन
रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. जुलै महिन्याचा लोकशाही दिन ७ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ ते २ या वेळेत होणार आहे. लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे प्र.उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.