- अमिता देशपांडे, संस्थापक : रिचरखा
टाकाऊतून टिकाऊ, पुनर्वापर, पुनर्प्रकिया... अशा किती तरी संकल्पना आपल्या कानावर पडत असतात. वाढती लोकसंख्या, प्लॅस्टिक-थर्माकोलचा वाढता वापर आणि त्यामुळे कचरा विघटनाचा अधिक चिघळत प्रश्न या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग निर्माण होत आहेत. त्यात ‘स्टार्टअप’पासून मोठ्या कंपन्यांपर्यंत अनेकांचा सहभाग आहे.
विघटनातून पुनर्निर्मितीच्या संकल्पनेकडे कसे वळलात?
- लहानपणापसून प्लॅस्टिक-थर्माकोलचा वापर जास्त करू नका, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते... असे कानांवर पडत होते. घरी, शाळेत तशी शिकवणही दिली गेली. अभियांत्रिकीची पदवी घेत असताना मी याच विषयाशी निगडित अनेक उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे. डोंगर, गड-किल्ल्यांवरील स्वच्छता, प्लॅस्टिक संकलन अशा प्रकारचे उपक्रम आम्ही करतच होतो.
त्यानंतर काही काळ ‘आयटी’मध्ये नोकरीदेखील केली. मात्र, मनात हाच विषय घोळत होता. त्यामुळे एक दिवस नोकरी सोडून यातच पूर्ण वेळ काम करायचं ठरवलं. अमेरिकेच्या ‘परड्यू’ विद्यापीठातून सस्टेनेबल डेव्हलपमेंट - सीएसआर’ याच विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. अमेरिकेत काही काळ नोकरी केली. त्यानंतर भारतात परत येऊन स्वतंत्र काम सुरू केलं.
स्वतःच्या उद्योगाची कल्पना कशी सुचली?
- भारतात परतल्यावर मी संशोधन सुरू केलं. प्लॅस्टिकचे विघटन करून त्यातून काही वस्तू तयार कराव्यात असं सुचलं. त्यासाठी मला रसायनांचा वगैरे प्रकल्प सुरू करायचा नव्हता. मला कचरा विघटन करण्याबरोबरच ग्रामीण महिलांना रोजगारही मिळवून द्यायचा होता. त्यामुळे मी ‘हस्तकले’चा पर्याय निवडला. त्यातूनच ‘रिचरखा’चा २०१५ मध्ये जन्म झाला.
प्लॅस्टिकच्या कॅरिबॅग, खाद्यपदार्थांची पाकिटे यांसारख्या विघटनासाठी किचकट ठरणाऱ्या गोष्टींवर प्रक्रिया करून आम्ही त्यातून पर्स, हॅन्डबॅग, लॅपटॉप बॅग अशा अनेक पर्यावरणपूरक वस्तू तयार केल्या आहेत. लहान मुलांसाठी काही खेळही तयार केले आहेत. आम्ही कार्यशाळा, प्रशिक्षणवर्ग घेतो, प्रात्याक्षिक दाखवतो.
या क्षेत्रात येण्यासाठी काय करावे?
- काही महाविद्यालयांकडून अशा प्रकारचे अभ्यासक्रम घेतले जातात. इंटरनेटवर त्यांची माहिती मिळू शकते. त्यासाठी शाश्वत विकास, सस्टेनेबल लिव्हिंग, सस्टेनेबल डिझाइन, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अशा प्रकारचे विषय निवडून तुम्ही पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात.
मात्र, पर्यावरणाविषयीची जाण, तळमळ असलेली कोणतीही व्यक्ती या स्वरूपाचे काम सुरू करू शकते असं मला वाटतं. तसेच, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असलात, तरी तुमचं कौशल्य, कला, कच्चा माल वगैरे पर्यावरणपूरक गोष्टींसाठी वापरण्याचं भान सदैव ठेवा. मी अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊनही आज हे काम करते आहे. त्यामुळे विशिष्ट प्रकारचं शिक्षण झालेलं असावं असं काही नाही.
शाश्वत विकासासाठी...
केवळ ‘ग्रीन वॉशिंग’ म्हणजे हिरवागार दिखावा नको, तर तशी कृतीही करा.
सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तरी सातत्य ठेवा.
कच्चा माल ते ‘पॅकेजिंग’ या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणभान सोडू नका.
(शब्दांकन - मयूर भावे)