मुंबई : बी२बी म्हणजेच बिझनेस टू बिझनेस एज्युकेशन प्लॅटफॉर्म क्रिझॅक लिमिटेड ८६० कोटी रुपयांचा आयपीओ (Krizak Limited ipo) आज २ जुलै रोजी उघडला. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये ४ जुलैपर्यंत गुंतवणूक करता येईल. क्रिझॅक लिमिटेड हे एजंट आणि जागतिक उच्च शिक्षण संस्थांसाठी एक बी२बी शिक्षण व्यासपीठ आहे. Krizak Limited यूके, कॅनडा, आयर्लंड प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील जागतिक उच्च शिक्षण संस्थांना आंतरराष्ट्रीय विद्यार्थी भरती उपाय देते.
किंमत पट्टा
आयपीओसाठी कंपनीने २३३ - २४५ रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला आहे. तर लॉट आकार ६१ शेअर्सचा आहे. क्रिझॅक लिमिटेडच्या आयपीओमध्ये फक्त ८६० कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (ओएफएस) मध्ये विकले जातील. नवीन शेअर्सची विक्री केली जाणार नाही. ओएफएसमध्ये कंपनीचे प्रवर्तक पिंकी अग्रवाल आणि मनीष अग्रवाल हे शेअर्स विक्रीसाठी ठेवतील. पिंकी अग्रवाल ७२३ कोटी रुपयांचे शेअर्स आणि मनीष अग्रवाल १३७ कोटी रुपयांचे शेअर्स विकतील. कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जात नसल्यामुळे आयपीओचे संपूर्ण उत्पन्न शेअर विक्रेत्यांकडे जाईल आणि कंपनीला काहीही मिळणार नाही.
शेअर्सचे लिस्टिंग
४ जुलै रोजी आयपीओ बंद झाल्यानंतर शेअर्सचे वाटप ७ जुलै रोजी अंतिम केले जाईल. शेअर्सचे लिस्टिंग ९ जुलै रोजी बीएसई, एनएसईवर होण्याची अपेक्षा आहे. इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि आनंद राठी सिक्युरिटीज लिमिटेड हे क्रिझॅक आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. रजिस्ट्रार MUFG Intime India Private Limited (Link Intime) आहे. कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयपीओद्वारे १००० कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु आता त्यांनी आकार कमी केला आहे. कंपनीने यासाठी कोणतेही विशिष्ट कारण दिलेले नाही.
कंपनीची आर्थिक स्थिती
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये क्रिझॅकचा महसूल १६ टक्क्यांनी वाढून ८८४.७८ कोटी रुपये झाला. एक वर्षापूर्वी महसूल ७६३.४४ कोटी रुपये होता. निव्वळ नफा २९ टक्क्यांनी वाढून १५२.९३ कोटी रुपये झाला. २०२३-२४ या आर्थिक वर्षात हा आकडा ११८.९० कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २५ मध्ये EBITDA वाढून २१२.८२ कोटी रुपये झाला, जो गेल्या वर्षी ७२.६४ कोटी रुपये होता. क्रिझॅक आयपीओमध्ये ५० टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि १५ टक्के बिगर-संस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.