क्रिकेट विश्वात सध्या कसोटी सामन्यांचा थरार पाहायला मिळत आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 चा किताब पटकावला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका सध्या झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. झिंबाब्वे दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेने प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे या दौऱ्यात भारतीय वंशाच्या केशव महाराज याला नेतृत्वाची संधी देण्यात आली.
केशव महाराज याने त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला विजयी सुरुवात करुन दिली. तर आता झिंबाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना हा 6 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार दुखापतीमुळे दुसर्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ‘प्रोटियस मेन’ या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
केशव महाराज याला ग्रोईन इंजरीमुळे दुसऱ्या सामन्याला मुकावं लागलं आहे. केशवला पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी बॅटिंग करताना डाव्या पायाच्या मांडीला दुखापत झाली. केशवला या दुखापतीमुळे झिंबाब्वे विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे केशवच्या अनुपस्थितीत आता ऑलराउंडर वियान मुल्डर याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
केशवने पहिल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. केशवने पहिल्या डावात 21 तर दुसऱ्या डावात 51 धावा केल्या. तसेच केशवने एकूण 4 विकेट्स घेतल्या. केशव यासह दक्षिण आफ्रिकेसाठी 200 विकेट्स घेणारा पहिला फिरकीपटू ठरला.
दक्षिण आफ्रिका टीम मॅनजमेंटने दुसऱ्या सामन्यात कर्णधार कोण असणार? हे देखील जाहीर केलं आहे. वियान मुल्डर याची नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. वियानने आतापर्यंत 87 रेड बॉल सामने खेळले आहेत. वियानने 87 पैकी 20 कसोटी सामने खेळले आहेत. वियानने लीसेस्टरशायरसाठी एका वनडे कप स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये नेतृत्व केलं होतं.
वियानने झिंबाब्वे विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात वियानने कसोटी कारकीर्दीतील सर्वोच्च धावसंख्या उभारली. वियानने 147 धावा केल्या होत्या.
दुसऱ्या कसोटीआधी दक्षिण आफ्रिकेच्या संघात मोठ्या घडामोडी
दरम्यान केशव महाराज याच्या जागी कसोटी संघात फिरकीपटू सेनुरन मुथुसामी याचा समावेश करण्यात आला आहे.