शिवसेना-राष्ट्रवादीत कुरघोडीचे राजकारण
निवडणुकांची तयारी : सामंत, निकम, तटकरेंचे डावपेच
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपचे कार्यकर्तेही पालकमंत्र्यांवर नाराज आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चढाओढ पाहायला मिळत आहे.
चिपळूणमधील शिंदे सेनेचे सात माजी नगरसेवक नेतृत्वावर नाराज आहेत. खासदार नारायण राणे यांच्या चिपळूण दौऱ्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री निधी देत नाही म्हणून नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून महायुतीमधील नाराजी नाट्य सुरू झाले. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कुरघोडी सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्ह्यात चिपळूणच्या राजकारणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे. मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या विरोधात प्रशांत यादव यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी रत्नागिरी, राजापूरमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षात घेण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. काही पदाधिकाऱ्यांच्या सामंत बंधूंबरोबर बैठकाही झाल्या आहेत.
राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी पहिल्यांदा प्रशांत यादव यांची भेट घेतली. त्यानंतर पालकमंत्री त्यांच्या वाशिष्ठी डेअरी प्रकल्पावर गेले. त्यावेळी यादव यांना शिवसेनेत निमंत्रण दिल्याचे जाहीरपणे सांगितले. प्रशांत यादव शिंदे सेनेत गेले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी उदय सामंत यांच्यावर टीका करणाऱ्या अजित यशवंतराव यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावरून पत्रकारांनी उदय सामंत यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना सामंत यांनी चिपळूण दौऱ्यात राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले. त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार शेखर निकम यांना लक्ष्य केले. शेखर निकम यांनी आपल्या स्टाईलने पालकमंत्र्यांना उत्तर दिले.
या राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे रत्नागिरीत आले होते. ते रस्ते सुरक्षा मंडळाच्या बैठकीसाठी आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अजित यशवंतरावांना पक्षात घेताना विचारले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. पण यापेक्षा जास्त टीका करणारे, एकमेकांच्या विरोधात निवडणूका लढलेले, खालच्या भाषेत बोलणारे नेते आता सोबत आले आहेत. त्यामुळे कोणी कोणाला काय सांगावे? एकंदरीत कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. चिपळूणच्या राजकारणामुळे या दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे.