रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सापडली पिशवी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये डोंबिवलीतील एक महिला प्रवासी पिशवी घाई गडबडीत विसरली. दुसऱ्या दिवशी याच एक्स्प्रेसने परतीचा प्रवास करताना भारतीय रेल्वे खाद्य आणि पर्यटन विभागाच्या (आयआरसीटी) कर्मचाऱ्याने ही विसरलेली पिशवी सुखरूप ठेवली होती. ही पिशवी शिर्डी येथील रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि संबंधित कर्मचाऱ्याने डोंबिवलीतील प्रवासी महिलेला परत केली.
डोंबिवलीतील अर्चना कदम, अनुप रवींद्र मुठे आणि ३० महिलांचा गट एका विवाह सोहळ्यासाठी साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसने शनिवारी कल्याण येथून गेला होता. आरक्षित तिकीट आसनावरून हा गट प्रवास करत होता. शिर्डी येथे उतरताना या महिलांमधील एका महिला पिशवी घाईगडबडीत साईनगर शिर्डी एक्स्प्रेसमध्ये रॅकमध्ये विसरली. या महिला लग्न सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांना आपल्यातील एका महिलेची पिशवी एक्स्प्रेसमध्ये विसरल्याचे आढळले. या पिशवीत खाऊ, छत्री आणि इतर वस्तू होत्या; मात्र आता पिशवी पुन्हा आपल्याला मिळणार नाही, असे त्या महिलांना वाटले.
दुसऱ्या दिवशी लग्न सोहळा आटोपल्यानंतर रविवारी डोंबिवलीतील महिलांचा गट पुन्हा शिर्डी रेल्वेस्थानकात परतीच्या प्रवासासाठी आला. साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसने त्या परतीचा प्रवास करणार होत्या. परतीचा प्रवास करण्यापूर्वी अर्चना कदम, अनुपा मुठे यांनी या एक्स्प्रेसमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाचे जवान शंकर यादव यांच्याकडे शनिवारी साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये विसरलेल्या पिशवीविषयी सहज विचारणा केली. जवान यादव यांनी यासंदर्भात तातडीने वंदे भारत एक्स्प्रेसमधील आयआरसीटीसीचा प्रवासी सहाय्यक कर्मचारी शिवा सिंग यांच्याकडे हरविलेल्या पिशवीबाबत विचारणा केली. शिवा सिंग यांनी पिशवी सांभाळून ठेवल्याचे सांगितले. शिवा सिंग यांनी एक्स्प्रेसमधील स्टोअर रूम कक्षात जाऊन ती पिशवी परत आणून जवान यादव यांच्या ताब्यात दिली. एक्स्प्रेसमध्ये विसरलेली पिशवी आपणास परत मिळाली याचा आनंद महिलांना झाला.