सतत सर्दी-खोकला होतोय?
esakal July 01, 2025 01:45 PM

- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट

‘एवढं का आजारी पडतेस गं?’, ‘सतत सर्दी-खोकला? ताप काही जातच नाही?’, तुम्हालाही वारंवार अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतंय का? मग तुमचं लक्ष फक्त औषधांकडे न जाता, प्रतिबंधात्मक आरोग्य आणि फंक्शनल मेडिसिनकडे वळायला हवं.

सर्दी-खोकला : फक्त व्हायरस नव्हे, एक सिग्नल!

आपलं शरीर सतत आपल्याशी संवाद साधत असतं. वारंवार सर्दी-खोकला होणं हे फक्त बाह्य विषाणूंमुळे नव्हे, तर शरीरातल्या इम्युन सिस्टिमच्या कमकुवतपणाचं लक्षण असू शकतं. फंक्शनल मेडिसिनमध्ये अशा लक्षणांकडे ‘root cause’ किंवा मूळ कारण शोधण्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं.

इम्युन सिस्टीम का कमकुवत होते?

1) गट हेल्थ बिघडलेली असणं

आपल्या पचनसंस्थेत (gut) शरीराच्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक प्रतिकारशक्तीचे पेशी असतात. सतत गॅसेस, अॅसिडिटी, किंवा बद्धकोष्ठतेसारख्या तक्रारी असल्यास हे तुमच्या इम्युन सिस्टिमवर परिणाम करत असतं.

2) व्हिटॅमिन व मिनरल कमतरता

व्हिटॅमिन D३ आणि B१२ : National Deficiency म्हणून डिक्लेअर करणं काही चुकीचं वाटणार नाही. D३ हे नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं, महिलांचे मूड स्विंग्ज होणं, पीएमएसचा त्रास असणं, हे सर्व व्हिटॅमिन B१२ च्या कमतरतेमुळे होतंय. B१२ व D३ ची कमतरता सगळ्यांमध्येच दिसून येते. झिंक, व्हिटॅमिन C, आणि Omega-३ फॅटी अॅसिड्स यांची कमतरता झाल्यास शरीर व्हायरल इन्फेक्शनशी लढू शकत नाही.

3) सतत स्ट्रेसमध्ये राहणं

मानसिक तणावामुळे कोर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो आणि इम्युन रिस्पॉन्स कमी होतो.

4) योग्य झोपेचा अभाव

झोप ही शरीराची नैसर्गिक रिपेअर प्रक्रिया आहे. कमी झोप म्हणजे कमजोर संरक्षण यंत्रणा.

5) अतिप्रक्रियायुक्त (processed) आहार

अतिरिक्त धान्याचा आहार, पॅकेज्ड फूड, साखर, सीड ऑईल्सचा वापर यामुळे शरीरात ‘क्रॉनिक इन्फ्लेमेशन’ तयार होतं, जे इम्युन सिस्टिमची ताकद कमी करतं.

फंक्शनल मेडिसिन काय करते?

फंक्शनल मेडिसिन म्हणजे केवळ लक्षणांवर उपाय नाही, तर मूळ कारणांवर उपाय. यामध्ये :

  • योग्य लॅब चाचण्या (जसं की Vit D३, झिंक, hsCRP, सीबीसी, स्टूल मायक्रोबिओम ॲनॅलिसिस)

  • अन्नातून किंवा सप्लिमेंट्सद्वारे पोषकद्रव्यांची भरपाई

  • अँटीइन्फ्लेमेटरी डाएट (प्रथिने, काही लो-कार्ब फळं, भाज्य, हळद, आले)

  • गट हेल्थ सुधारण्यासाठी प्रोबायोटिक्स

  • तणाव नियंत्रणासाठी ध्यान, योग

काय करू शकता तुम्ही?

  • दररोज १५-२० मिनिटं सूर्यप्रकाश घ्या (व्हिटॅमिन D साठी)

  • आहारात लसूण, आले, हळद यांचा समावेश करा

  • रात्रीची झोप कमीत कमी सात तास घ्या

  • पचन चांगलं ठेवण्यासाठी रात्रीचे कर्बोदके कमी ठेवा

  • दररोज चालणं, योग किंवा हलका व्यायाम

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.