IPO Listing : आयपीओ गुंतवणूकदार मालामाल, लिस्टिंगलाच प्रत्येक शेअरवर मिळाला ९२ रुपये नफा
ET Marathi July 01, 2025 05:45 PM
मुंबई : एलेनबेरी इंडस्ट्रियल गॅसेस लिमिटेडच्या शेअर्सनी मंगळवार १ जुलै २०२५ रोजी शेअर बाजारात जोरदार सुरुवात केली. कंपनीचे शेअर्स बीएसईवर ४९२ रुपयांवर सूचीबद्ध झाले. आयपीओमध्ये प्रति शेअर किंमत ४०० रुपये होती. म्हणजे गुंतवणूकदारांना लिस्टिंगला प्रत्येक शेअरवरर ९२ रुपये फायदा झाला आहे. एनएसईवर हा शेअर ४८६ रुपयांवर सूचीबद्ध झाला. कंपनीचे पदार्पण ग्रे मार्केटच्या अपेक्षेपेक्षा चांगले होते. लिस्टिंगपूर्वी शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) 57 रुपयांवर होता. म्हणजेच अनधिकृत बाजारात शेअर्स 457 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता.



इतक्या शेअर्सची विक्री

एलेनबेरी इंडस्ट्रियल गॅसेसच्या ८५२.५३ कोटींच्या आयपीओमध्ये ४०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि ४५२.५३ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (ओएफएस) मध्ये विकले गेले. यामध्ये कंपनीने १ कोटी नवीन शेअर्स जारी केले. तर १.१३ कोटी शेअर्स प्रमोटर्सनी विकले. हा आयपीओ २४ जून ते २६ जून २०२५ पर्यंत खुला होता. शेअर्सचे वाटप २७ जून रोजी अंतिम करण्यात आले.



लाॅट आकार

किरकोळ गुंतवणूकदारांना किमान एका लॉटसाठी (३७ शेअर्स) अर्ज करणे आवश्यक होते. तर एसएनआयआय (लहान बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार) साठी १४ शेअर्सचा लॉट म्हणजेच ५१८ शेअर्स होते. कंपनीने आयपीओपूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून २५५.७६ कोटी रुपये उभारले होते.



निधीचा वापर

एलेनबॅरी इंडस्ट्रियल गॅसेस लिमिटेड या आयपीओमधून उभारलेल्या निधीचा वापर कंपनीची आर्थिक आणि ऑपरेशनल स्थिती मजबूत करण्यासाठी करेल. यापैकी २१० कोटी रुपये जुने कर्ज अंशतः किंवा पूर्णपणे फेडण्यासाठी वापरले जातील. यामुळे कंपनीचा कर्जाचा भार कमी होईल आणि ताळेबंद सुधारेल. याशिवाय पश्चिम बंगालमधील उलुबेरिया-२ प्लांटमध्ये १०४.५ कोटी रुपयांच्या खर्चाने २२० टीपीडी क्षमतेचे एक नवीन एअर सेपरेशन युनिट स्थापित केले जाईल. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट गरजांसाठी वापरली जाईल.



कंपनीबद्दल

एलनबेरी इंडस्ट्रियल गॅसेसची सुरुवात १९७३ मध्ये झाली. ही भारतातील एक प्रसिद्ध कंपनी आहे जी औद्योगिक, वैद्यकीय आणि विशेष वायूंचे उत्पादन आणि पुरवठा करते. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, हेलियम, हायड्रोजन, आर्गॉन, एसिटिलीन, नायट्रस ऑक्साईड, एलपीजी, वेल्डिंग वायू, कृत्रिम हवा आणि कोरडा बर्फ यासारख्या वायूंचा समावेश आहे.



कंपनी स्टील, फार्मा, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा, पेट्रोकेमिकल्स, रेल्वे आणि संरक्षण अशा अनेक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात, पॅकेज्ड आणि ऑनसाईट मॉडेल्सद्वारे सेवा देते. आर्थिक वर्ष २५ पर्यंत कंपनीचे १,८२९ ग्राहक आहेत. तर पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये एकूण आठ उत्पादन युनिट्स आहेत. ३१ मार्च २०२५ पर्यंत कंपनीमध्ये २८१ कायमस्वरूपी आणि ८५ कंत्राटी कर्मचारी होते.



© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.