तरुणावर सामूहिक अत्याचार; LGBTQ समुदायानं डेटिंग ॲप वापरताना काय खबरदारी घ्यावी?
BBC Marathi July 01, 2025 11:45 PM
Getty Images संकल्पनात्मक चित्र

LGBTQ समुदायासाठी असलेल्या डेटिंग अॅपचा वापर करून एका 30 वर्षीय बँक अधिकाऱ्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना अकोला इथं घडली आहे.

आरोपींनी या तरुणाच्या खात्यात असलेले पैसे सुद्धा स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. तसेच त्याला पैशांसाठी अजून धमक्या देणं सुरू होतं.

अकोल्यातील हा बँक अधिकारी या आरोपींच्या जाळ्यात कसा फसला? त्याची कशी फसवणूक झाली? याआधी या डेटिंग अॅपच्या माध्यमातून LGBTQ समुदायाची फसवणूक करण्याच्या अशा काही घटना घडल्या आहेत का? हे घडू नये यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी? जाणून घेऊयात.

अकोल्याचा बँक अधिकारी कसा अडकला?

पीडित तरुणाने त्याच्या मोबाईलमध्ये एक अॅप इन्स्टॉल केलं होतं. या अॅपद्वारे LGBTQ समुदायातील लोक एकमेकांशी संपर्क साधतात, चॅटिंग करतात, डेट करायला पार्टनर शोधतात.

तसेच हा पीडित तरुण सुद्धा पार्टनर शोधत होता.

अॅपच्या माध्यमातून मनिष नाईक या आरोपीसोबत संबंधित तरुणाची ओळख झाली. त्यानंतर 14 जूनला आपण शहराच्या बाहेर कुठंतरी भेटू असं ठरलं. ठरल्यानुसार पीडित तरुण आणि आरोपी मनिष नाईक भेटले आणि कारमधून शहराच्या बाहेर असलेल्या हिंगणा फाट्याजवळ गेले.

याठिकाणी दोघांनी संबंध प्रस्थापित केले. पण, इतक्यात आरोपी मनिष नाईकने इतर साथीदारांना बोलावून घेतलं आणि त्यांनी सुद्धा त्याच्यावर अत्याचार केला. या घटनेचे व्हीडिओ रेकॉर्ड केले.

Getty Images

तसेच तरुणाच्या अकाऊंटमध्ये असलेले 80 हजार रुपये स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. घटनेचे रेकॉर्ड केलेले व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आणखी पैशांची मागणी सुरू केली. भीतीपोटी या तरुणाने पोलिसांत तक्रार दिलेली नव्हती.

Getty Images

वारंवार पैशांसाठी फोन येत असल्यानं तरुणाला असह्य झालं. त्यामुळे पीडित तरुणाने दोन दिवसांपूर्वी संबंधित पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे, अशी माहिती संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षण मनोज केदारे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना दिली.

पोलिसांनी पीडित तरुणाच्या मदतीनं सापळा रचला आणि आरोपी मनिष नाईकसह मयुर बागडे या दोन आरोपींना अटक केली असून आणखी दोन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हे आरोपी LGBTQ समुदायातील नसल्याचं त्यांनी तपासादरम्यान सांगितलं आहे. त्यामुळे अशा फसवणुकीच्या हेतूने ते अॅपमध्ये घुसले होते. या आरोपींनी याआधीही LGBTQ समुदायातील एकाची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलं असल्याचं पोलीस निरीक्षक केदारे यांनी सांगितलं.

डेटिंग अॅपच्या माध्यमातून LGBTQ समुदायातील लोकांची फसवणूक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही महाराष्ट्रासह देशात अशा घटना घडलेल्या आहेत.

याआधीही महाराष्ट्रात घडल्या होत्या घटना?

LGBTQ समुदायातील लोक वापरत असलेल्या डेटिंग अॅपच्या माध्यमातून नागपुरातील एका तरुणासोबत 2022 मध्ये असाच प्रकार घडला होता.

एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून एका 19 वर्षीय तरुणाची आरोपींसोबत ओळख झाली होती. त्यानंतर भेटायला बोलावून आरोपीसह त्याच्या एका मित्रानं या पीडित व्यक्तीवर अत्याचार केला होता. त्यानंतर दोघांनीही पळ काढला होता.

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हाही दाखल केला होता.

Getty Images

तसेच याआधी पुण्यात सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. पण, यापैकी बोटावर मोजण्याइतके लोक पोलिसांकडे तक्रार करतात. कारण, आपली ओळख सार्वजनिक होण्याची भीती या लोकांना असते. त्यामुळे घटना घडतात तरी समोर येत नाही.

पण, अशा डेटिंग अॅपच्या माध्यमातून LGBTQ समुदायातील लोकांसोबत फसवणुकीच्या घटना घडल्यानंतर जे लोक थेट पोलीस ठाण्यात जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी पुण्यात 'युतक' नावाची संस्था काम करते.

डेटिंग अॅपच्या माध्यमातून LGBTQ समुदायाच्या लोकांच्या फसवणुकीचं प्रमाण वाढलं?

या संस्थेकडे दोन वर्षांपूर्वी वर्षाला फक्त दोन-तीन अशा केसेस नोंदवल्या जात होत्या. पण, गेल्या वर्षभरात डेटिंग अॅपवरून फसवणूक झाल्याच्या 14 प्रकरणाच्या तक्रार दाखल झाल्या आहेत.

LGBTQ समुदायातील लोकांची डेटिंग अॅपवरून फसवणूक होण्याच्या घडल्या वाढल्या आहेत. या घटना पुणे जिल्ह्यातल्या आहेत.

महाराष्ट्रातील इतर भागांतून देखील या संस्थेकडे तक्रारी दाखल होतात. नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगरमधून देखील अशा तक्रारी आलेल्या आहेत, असं युतक संस्थेचे अरविंद उकरंडे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.

ते पुढे सांगतात, दोन दिवसांपूर्वीच संभाजीनगरमधून डेटिंग अॅपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याच्या दोन तक्रारी आल्या आहेत. भेटायला गेल्यानंतर एका व्यक्तीला मारहाण केली, त्याच्याकडून पैसे घेतले आणि सगळी कागदपत्रं हिसकावून घेतली. आणि पगार झाला की परत पैसे दे, अशा धमक्या दिल्याच्या या घटना आहेत. त्या लोकांनी या संस्थेकडे तक्रार केली. पण, ते पोलिसांत जायला तयार नाहीत.

या तक्रारी दाखल झाल्यानंतर या पीडित लोकांना समजावून सांगून त्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही संस्था करते.

त्यांच्याकडे पुण्यात तक्रारी दाखल झाल्यानतंर बंड गार्डन पोलीस ठाणे, पर्वती पोलीस ठाणे आणि खराडी अशा संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करून गुन्हे दाखल करायला लावल्याचं अनिल सांगतात.

Getty Images

पण, ग्रामीण भागात अशा संस्था नाहीत. त्यामुळे त्यांना माहितीही नसतं की कोणाकडे तक्रार करायची. तसेच लोक तक्रार करायलाही घाबरतात. त्यामुळे अशा घटनांची आकडेवारी आणखी जास्त असू शकते अशी भीतीही ते व्यक्त करतात.

असा अत्याचार झाला किंवा फसवणूक झाली तर संबंधित पीडित व्यक्तीनं समोर येऊन पोलिसांत तक्रार करायला हवी. कारण, आपण भीतीपोटी तक्रार करत नाही. त्यामुळे सायबर गुन्हेगार किंवा अशी डेटिंग अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या लोकांची हिम्मत वाढते.

पण, एकदा पोलिसी खाक्या दिसला की या गुन्हेगारांवर वचक बसेल. तसेच तक्रार आल्यानंतर पोलिसांनी सुद्धा सहकार्य करावं अशी अपेक्षाही अनिल व्यक्त करतात.

मुंबईतील नक्षल बागवे हे सुद्धा या समुदायातील लोकांसाठी काम करतात. त्यांच्याकडे डेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेक तक्रारी येत असल्याचं ते सांगतात.

Getty Images

ते म्हणतात, पूर्ण देशभरातून महिन्याला 30-40 अशा तक्रारी येतात. यापैकी बऱ्याच केसेस दिल्ली, नोएडा आणि गुडगावच्या आहेत. पण, लोक पोलीस ठाण्यात तक्रार करायला तयार नसतात.

जे पोलिसांत तक्रार करायला तयार असतात त्यांची तक्रार आम्ही नोंदवतो. पण, ज्यांना आपली ओळख समोर आणायची नसते त्यांच्यासाठी आम्ही आरोपी शोधून काढतो. त्यासाठी आम्ही आधी पूर्ण पुरावे गोळा करतो. ती व्यक्ती तीच आहे हे माहिती झाल्यानंतर या या व्यक्तीपासून सावध राहायला हवं असं आमच्या कम्युनिटीमध्ये पण सांगतो.

त्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचतो. एकदा अशा फसवणूक करणाऱ्यांच्या घरी प्रकरण पोहोचलं की ते गुन्हा कबुल करून पैसे पण परत देतात.

काही वेळा तक्रारदार तयार झाला तर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे सुद्धा दाखल होतात.

अकोल्यातील ज्या पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली त्या पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षण मनोज केदारे देखील अशा घटना घडलेल्या LGBTQ समुदायातील लोकांनी तक्रार नोंदवायला पुढे यावं असं आवाहन करतात.

ते म्हणतात, आता ज्या आरोपींना अटक केली त्यांनी याआधी असेच प्रकार केले आहेत. पण, त्याबद्दल तक्रार करायला कोणी पुढे येत नाही.

तक्रार दाखल झाल्याशिवाय आम्ही कारवाई करू शकत नाही. आता ही तक्रार दाखल झाल्याबरोबर आम्ही लगेच तपास हाती घेऊन आरोपींना अटक केली. त्यामुळे या लोकांनी तक्रार करायला पुढे यावं जेणेकरून आम्हाला कारवाई करता येईल.

अशा घटना घडू नये यासाठी नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी?

अशा डेटिंग अॅपवरून या समुदायाची फसवणूक होऊ नये यासाठी नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी, त्या व्यक्तीला भेटायला जाताना कुठल्या गोष्टी ध्यानात ठेवायला हव्या याबद्दल युतक संस्थेचे अनिल सल्ला देतात.

डेटिंग अॅपवर ओळख झाल्यानंतर आधी समोरच्या व्यक्तीची फोटो मागवायला हवे. फोटो मागवल्यानंतर हे फोटो त्याचेच आहेत हे तपासून बघायचं. याआधी एक दोन वेळा व्हीडिओ कॉलवर बोलायला हवं.

त्यानंतर सहज गजबजलेल्या परिसरात भेटून त्या व्यक्तीची ओळख करून घेणं. तो कसा बोलतो, तो कसा वागतो हे सगळे निरीक्षणातून समजून घेणं. त्यानंतर एकदा खात्री पटली की त्या व्यक्तीला एकट्यात भेटू शकता.

पण, असं एकट्यात भेटायला जातना सुद्धा त्या व्यक्तीचा फोटो, जागा, नंबर हे सगळं आपल्या जवळच्या मित्रासोबत शेअर करावं जेणेकरून अशा काही घटना घडल्या तर त्या व्यक्तीला तुम्ही कुठे होतात हे माहिती असेल.

Getty Images

अनेकदा गुन्हेगारांची पूर्ण टीम मिळून हा फसवणुकीचा सापळा रचला जातो. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक क्षणांचे व्हीडिओ देखील काढले जातात, मारहाण होते.

अशा वेळी हिंमत करून पोलिसांच्या इमर्जन्सी नंबरवर फोन करण्याचं धाडस दाखवलं पाहिजे. तेव्हा जर हे झालं नाहीतर घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनच्या दारात उभं राहून तक्रार करायला पुढे आलं पाहिजे, असा सल्ला अनिल देतात.

तसेच पोलीस निरीक्षण मनोज केदारे देखील सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीची आधी शहानिशा करावी असं सांगतात.

ते म्हणतात, कुठल्याही वेबसाईटवर अकाऊंट तयार करताना ती वेबसाईट, अॅप किती अधिकृत आहे याची माहिती काढावी.

ज्या व्यक्तीसोबत आपण बोलतोय ती किती विश्वास ठेवण्यासारखा आहे याची खात्री करावी. पण, ऑनलाईन ओळखीच्या आधारावर संवाद करणे, असे भेटायला जाणं धोकादायक ठरू शकतं. त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे अशा अॅपवरून ओळख झाल्यानंतर त्याची पूर्णपणे खात्री करून घ्यावी.

Getty Images

मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते नक्षत्र बागवे सुद्धा अशी फसवणूक टाळण्यासाठी सल्ला देतात.

ते सांगतात, या समुदायातील लोक घरच्यांपासून आपली ओळख लपवतात. त्यामुळे आपल्याला साथ देतील असे मित्र जोडायला हवेत. तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटायला जाताना आपल्या मित्राला संबंधित व्यक्तीचे फोटो, संपर्क क्रमांक शेअर करा आणि आपण सुरक्षित आहोत की नाही यासाठी त्याला फोन करायला सांगा.

तसेच लोकांना, घरच्यांना तुमच्याबद्दल माहिती नाही असं अनोळखी व्यक्तीला सांगू नका. कारण, जी व्यक्ती आपली ओळख लपवतात त्याच व्यक्तींना असे गुन्हेगार टार्गेट करतात. त्यामुळे तुम्ही ओपन आहात, या समुदायाचे आहात असं सांगा.

तसेच अनोळखी व्यक्तीला भेटायला जाताना तुमच्या मोबाईलमधील बँकेचे अॅप डिलिट करा, महागडे घड्याळ, सोन्याचे दागिने घालून जाणं टाळा. यामुळेही आर्थिक फसवणूक होऊन ब्लॅकमेल करू शकतात.

कुठल्याही हॉटेल किंवा घरी भेटायला जात असाल तर तिथं हिडन कॅमेरे लावले आहेत का, तुमच्या दोघांशिवाय तिथं आणखी कोण आहे का? याचा शोध घ्या.

जगभरातही घडतात असे प्रकार

फक्त भारतातच नाहीतर जगभरातही LGBTQ समुदायातील लोकाचंया अशा डेटिंग अॅपच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. इंग्लंडमध्ये पोलिसांनी अशा टोळीला अटकही केली आहे.

इतकंच नाहीतर इजिप्तमध्ये पोलीसच LGBT समुदायातील लोकांना टार्गेट करण्यासाठी या डेटिंग अॅप्सचा गैरवापर करत असल्याचं समोर आलं होतं.

इजिप्तमध्ये LGBT समुदायाविरोधात कुठलाही कायदा नाही. पण, अशा डेटिंग अॅपच्या माध्यमातून फेक आयडी बनवून पोलीस त्या व्यक्तीसोबत बोलायचे. त्या व्यक्तीनं भेटावं यासाठी विश्वास निर्माण करायचे आणि त्यानंतर अश्लीलता या आरोपाखाली त्याला अटक केली जात होती.

तसे पुरावे बीबीसीच्या हाती लागले होते. त्यानुसार बीबीसीने केलेली स्टोरी तुम्ही इथं वाचू शकता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • सागर कारंडेची 62 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक; 'अशी' झाली होती फसवणूक
  • 'डिजिटल अरेस्ट' म्हणजे काय? फसवणूक टाळण्यासाठी काय करावं?
  • झटपट कर्ज देण्याचा दावा करणारे अॅप्स तुमची कशी फसवणूक करतात?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.