कात्रज - आमची आई शोधून द्या; आमची मुलगी शोधून द्या! असे म्हणत प्रज्ञा किरण मारणे (वय-३५) या बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांनी आज (ता. १) पुणे पोलिस आयुक्तालयाच्या बाहेर आंदोलन केले. संबंधित महिला ५ जूनपासून बेपत्ता आहे. दाढ दुखत असल्याने उपचार घेण्यासाठी भारती हॉस्पिटलमध्ये त्या गेल्या होत्या.
उपचार घेतल्यानंतर त्यांनी घरी फोन केला आणि घरी येत असल्याची माहिती कुटुंबियांना दिली. मात्र, त्या घरी परतल्याच नाहीत. तेव्हापासून त्या बेपत्ता आहेत. त्यानंतर नातेवाईकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. मात्र, पोलीस तपास करत नसल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.
गेल्या २५ दिवसांपासून महिला बेपत्ता असल्याने महिलेची लहान मुलं, आई आणि नातेवाईकांनी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. आमची आई, आमची मुलगी, आमची बहीण, परत कधी मिळणार अश्या प्रकारचे पोस्टर त्यांनी यावेळी हातात घेतले होते.
माझी पुतणी मागील २५ दिवसांपासून कात्रज चौकातून गायब झाली आहे. यासंदर्भात आम्ही भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पंरतु, आजतागायत काहीही ठोस तपास पोलिसांकडून करण्यात आलेला नाही. आम्ही स्वतः संपूर्ण पुणे जिल्हा पिंजून काढला आहे.
सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्सही लावले. माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपयांचे बक्षिसही जाहीर केले आहे. अनेक तालुक्यात माध्यमांत जहिराती प्रसिद्ध केल्या. मात्र, तरीही तपास लागला नाही. त्यामुळे हताश होऊन मुलीची आई, दोन मुले, पती, सासू-सासरे, दोन भाऊ यांनी आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची भेट झाली नाही.
सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांची भेट घेत संपूर्ण माहिती दिली. येत्या दहा तारखेपर्यंत तपास लागला नाही. तर आम्ही मुंबईतील पावसाळी अधिवेशनात जाऊन अंदोलन करणार असल्याचे मारणे यांच्या नातेवाईक स्वाती ढमाले यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
या प्रकरणाची पूर्णपणे माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरिक्षकांना सूचना देण्यात आल्या असून त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे. लवकरच महिलेचा शोध लागेल.
- रंजनकुमार शर्मा, पोलिस सहआयुक्त.