रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू संघाच्या विजयी रॅलीदरम्यान चिन्नास्वामी स्टेडिअमबाहेर चेंगराचेंगरी झाली होती. याचा ठपका ठेवत कर्नाटक सरकारने काही पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले होते.
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये आयपीएस विकास कुमार यांचाही समावेश होता. बेंगलुरू शहर पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून त्यांच्यावरही नियोजनाची जबाबदारी होती.
विकास कुमार यांनी निलंबनाच्या निर्णयाला थेट कॅट म्हणजेच केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात आव्हान दिले. कॅटने विकास कुमार यांच्या बाजूने निकाल देत सरकारला दणका दिला आहे.
विकास कुमार हे मुळचे बिहारचे असले तरी झारखंडमधील सैनिकी शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. तिथेच त्यांना शिस्त आणि मेहनतीचे महत्व समजले.
दिल्ली विद्यापीठातील भूगोल विषयात पदवी, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर नेट परीक्षा उत्तीर्ण होत फेलोशिपही मिळवली.
विकास कुमार यांनी शिक्षण घेत असताना केंद्रीय सेवांसाठी तयारी सुरू केली होती. 2004 मध्ये दिलेल्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले अन् आयपीएससाठी त्यांची निवड झाली. त्यांना कर्नाटक केजर मिळाले.
विकास यांची आतापर्यंत बेंगलुरू ग्रामीण, हावेरी आणि चिकमंगलूर जिल्ह्यांचे पोलिस अधिक्षक, बेंगलुरू शहरचे उपायुक्त, मंगलौरमध्ये आयुक्त अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांना डीआयजी रँकही मिळाली आहे.
विकास यांच्याबाबत कॅटने दिलेल्या निर्णयाचा फायदा इतर निलंबित अधिकाऱ्यांनाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांचे निलंबनही रद्द होऊ शकते. हा कर्नाटक सरकारला धक्का मानला जात आहे.