Ahilyanagar Accident: रस्ते उठले जीवावर; वेग झाला अनावर! तेराशे अपघात; ९६० मृत्यू, उपाययोजनांकडे कानाडोळा
esakal July 02, 2025 09:45 AM

-अरुण नवथर

अहिल्यानगर : अपघातांच्या घटनांमध्ये जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. येथील अपघातांचे सत्र थांबता थांबेना. वर्षभरात जिल्ह्यातील महामार्गांवर एक हजार ३२५ अपघात झाले असून, त्यात साडेनऊशेहून अधिक व्यक्तींचा जीव गेला. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या ठिकाणांकडे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने दुर्लक्ष केले आहे. ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखली जाणारी ४३ धोकादायक वळणे देखील अद्याप अविकसितच आहेत. त्यामुळे अपघातांचे हे सत्र थांबणार कधी? असा संतप्त सवाल प्रवाशांसह विविध सामाजिक संघटना उपस्थित करत आहेत.

सातारा तालुका हादरला! 'मैत्रीण दुसऱ्याबरोबर दिसल्याने मुलाने जीवन संपवले'; तिने मला धोका दिला मी जगणार नाही अन..

अहिल्यानगरमधून जाणाऱ्या पुणे, कल्याण, जामखेड, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, पाथर्डी या महामार्गांवर सर्वाधिक अपघात झालेले आहेत. अपघातांचे हे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील महामार्गांवर ४३ ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आलेले आहेत. असे असले वर्षभरात ब्लॅक स्पॉटसह अन्य ठिकाणी एक हजार ३२५ अपघात झाले असून, त्यात ९६० व्यक्तींचा मृत्यू झाला. अनेकांना अपंगत्व देखील आले आहे. महामार्गांवर असे अपघात होऊ नयेत, यासाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे.

त्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन विभाग, बांधकाम विभाग यांच्या वेळोवेळी संयुक्त बैठका झाल्या. ‘ब्लॅक स्पॉट’बाबत काय उपाययोजना करता येतील, याचा ऊहापोह बैठकांमध्ये झाला. उपाययोजनांबाबतचा अहवाल देखील शासनाला पाठवण्यात आला. परंतु अनेक वर्षे उलटूनही हा अहवाल शासन दरबारी धूळखात पडला आहे. स्थानिक पातळीवर देखील लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी अपघातांची मालिका सुरूच आहे.

काय असाव्यात उपाययोजना?

शहरासह जिल्ह्यातील ‘ब्लॅक स्पॉट’सह अन्य ठिकाणी अपघाती वळण म्हणून माहिती देणारे फलक हवेत. रस्त्यांचे रुंदीकरण करणे, पूल बांधणे, धोकादायक वळणावर वाहतूक पोलिस नियुक्त करणे, वाहनांची वेगमर्यादा तपासण्यासाठी महामार्ग पोलिसांचे मनुष्यबळ वाढविणे, यांसारख्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वेग मर्यादा ओलांडणारे वाहनचालक, तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर तत्काळ कारवाई होणे गरजेचे आहे.

‘वेग’ अपघाताचे प्रमुख कारण

महामार्गावर चारचाकी वाहनांना सरासरी ८० ते ९० अशी वेग मर्यादा निर्धारित करण्यात आलेली आहे, तर वळण, घाट अशा ठिकाणी ३० ते ४० अशी वेगमर्यादा आहे. ट्रक, टेम्पो, कंटेनर अशा अवजड वाहनांची वेग मर्यादा देखील निर्धारित असते. परंतु वाहनचालक या वेग मर्यादेचे पालन करत नाहीत. निर्धारित वेग मर्यादा ओलांडल्यामुळेच अनेकांना अपघांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

रिफ्लेक्टर, फलक गरजेचे

महामार्गांवर वेग मर्यादा, धोकादायक वळणे, एकेरी रस्ता, अपघात प्रवण क्षेत्र यासारखे फलक लावणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रिफ्लेक्टरची गरज आहे. रस्ता सुरक्षा समितीने या उपाययोजना अनेकदा सूचविलेल्या आहेत. परंतु संबंधित यंत्रणेकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. पांढरी पूल येथे तर अपघात होऊन ट्रक, कंटेनर, कार अशी वाहने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांना धडकली आहेत. या ठिकाणी देखील कोणतेही फलक नाहीत.

धक्कादायक प्रकार! 'आठ कोटी रक्कम देशभरातील पाचशे खात्यांवर वर्ग'; दहशतवादी संघटनेला पैसे पाठवण्याचे सांगितले कारण

अपघात रोखण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत उपाययोजना सूचविल्या जातात. त्याची अंमलबजावणी करून अपघातांची संख्या कमी करण्यावर भर देण्यात येतो. तसेच जिल्ह्यात ४३ ‘ब्लॅक स्पॉट’ घोषित करण्यात आले असून, तेथेही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. वेगात वाहन चालविणे हे अपघाचे एक प्रमुख कारण आहे.

- विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.