दौंड : आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर दौंड तालुक्यात झालेल्या अत्याचारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. मागील आठवड्यात तालुक्यात झालेले दोन खून, चोर्या आणि अन्य गुन्ह्यांचा छडा पोलिसांना लावता आलेला नाही. दौंड पोलिस ठाण्यातील एका अंमलदाराने दरोड्यातील संशयित आरोपीकडे लाच मागण्याची हीन पातळी गाठल्यावरही लाचखोरी थांबलेली नाही.
स्वामी चिंचोली ( ता. दौंड) येथे पंढरपूर येथे निघालेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर ३० जून रोजी दोन तरूणांनी शस्त्राचा धाक दाखवून अत्याचार केला. अहोरात्र वाहतूक असणार्या आणि सध्या आषाढी वारी असल्याने वर्दळ वाढलेल्या पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच हा प्रकार घडला आहे.
स्वामी चिंचोली येथे ७ डिसेंबर २०२४ रोजी पडलेल्या एका दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीकडे दौंड पोलिस ठाण्यातील रमेश शिवाजी कर्चे (वय ३६) या अंमलदाराने लाच मागितली होती. या बाबत २९ मे २०२५ रोजी गुन्हा दाखल आहे. या कारवाईनंतर लाचखोरी बंद न होता एजंटांची संख्या वाढली आहे. गिरीम येथे डोंगरात २५ जून रोजी मोहन धूळा तालवर ( वय ४५ , रा. गिरीम ) या मेंढपाळाचा भरदिवसा कुर्हाडीने निर्घुणपणे खून करण्यात आला. या खुनाचा तपास लागलेला नाही.
बिरोबावाडी येथे २६ जून रोजी शेताच्या बांधावरून झालेल्या वादातून कैलास हगारे यांच्यावर चुलत भावांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात कैलास यांचा डावा पाय नडगीपासून व उजवा हात मनगटापासून क्रुरपणे तोडण्यात आला. या प्रकरणात ३ महिलांसह एकूण ६ जणांविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. २७ जून रोजी यवत हद्दीतील श्री भुलेश्वर घाटाच्या पायथ्याशी अंदाजे ३० ते ३५ वय असलेल्या अज्ञात तरूणाचा खून झाला. अर्धवट जळालेल्या अवस्थेतील या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.
दौंड व यवत पोलिसांकडून गुन्ह्यांची वेळेत उकल होत नसल्याने पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून गुन्ह्यांचा तपास केला जात आहे. त्यामुळे या पोलिस ठाण्यातील अन्वेषण शाखा, बीट अंमलदार व विविध पथके नेमके काय करतात ?, हा प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठांचे पुरवठादार असणारे मोजके कर्मचारीच पोलिस ठाण्याचे संचलन करीत आहेत. सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचे प्रस्ताव पडून असून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने ते राजरोसपणे गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय आहेत. पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी तालुक्यातील गुन्ह्यांचा छडा लावण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तातडीने ठोस सुधारात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
तपास कोण करणार ?दौंड तालुक्यात पोलिसांचा धाक न राहिल्याने सर्व अवैध व्यवसाय सुरू असून गुन्हेगार मोकाट आहेत. तालुक्यात जुगाराचे अड्डे, गोहत्या, अवैध प्रवासी वाहतूक, दुचाकी वाहनांची चोरी, एमआयडीसी मधील चोर्या, गावठी दारूचे गुत्ते, गांजा विक्री, बनावट दारू, वेश्या व्यवसाय, महामार्ग व अष्टविनायक मार्गावर वाटमारी, आदी प्रकार सुरू आहेत. सोईने गुन्हे दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. मात्र दाखल गुन्ह्यांच्या तपासाचा नियमित आढावा वरिष्ठ घेत नसल्याने कनिष्ठ तपासाविषयी गंभीर नसल्याची स्थिती आहे.