BAMU : विद्यापीठात प्रवेशासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ; पदवी, पदव्युत्तरसाठी २,३९९, तर कोर्सेसला २८९ विद्यार्थ्यांची नोंदणी
esakal July 02, 2025 09:45 AM

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी ३० जूनपर्यंत २ हजार ६८८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. अद्याप बीए आणि बीएस्सीच्या अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले नसल्याने विद्यापीठ प्रशासनाकडून ऑनलाइन नोंदणीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनात प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी (ता. ३०) प्रवेश समितीच्या बैठकीत १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. पदवी अभ्यासक्रमाच्या टक्केवारीवर आधारित गुणवत्तेवर ५६ विभागांमध्ये थेट प्रवेश देण्यात येणार आहेत.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ परिसरातील ४६, तर धाराशिव उपपरिसरातील १० अभ्यासक्रमांचा समावेश आहे. गतवर्षीच्या पहिल्या टप्प्यापेक्षा यंदा नोंदणी वाढली आहे. मुदतवाढीत प्रवेशाला चांगला प्रतिसाद मिळण्याची विभागांना आशा आहे. मात्र, पारंपरिक कला शाखेतील अभ्यासक्रमांना प्रवेशाची चिंता कायम आहे. समर्थ पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव माधव वागतकर यांनी आवाहन केले.

काही अभ्यासक्रमांसाठी ‘सीईटी’

एमएड, एमपीएड, एमबीए, एमसीए, एमटेक फूड टेक्नॉलॉजी, ड्रग्ज अॅण्ड फार्मस्युटिकल्स, क्वालिटी अॅश्युरन्स, एमफार्मसी- फार्मास्युटिकल्स या अभ्यासक्रमांचे प्रवेश सामायिक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून होणार आहेत. तसेच, यावर्षी सुरू केलेल्या चारही ऑनर्स कोर्सेससाठी क्षमतेच्या दुप्पट विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

विद्याशाखा नोंदणीची स्थिती

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील २५ विषयांपैकी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ८४३, पदवी अभ्यासक्रमासाठी १७४, तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी १३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बीएस्सी ऑनर्स डेटा सायन्ससह संगणक व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांना क्षमतेच्या दुप्पट नोंदणी झाली आहे.

मानव्यविद्या शाखेच्या २१ विषयांपैकी पदवीसाठी केवळ १६० तर पदव्युत्तर १०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी २२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

आंतरविद्या शाखेत एकूण सात अभ्यासक्रम आहेत. त्यासाठी केवळ ३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर, विधी पदव्युत्तर प्रवेशासाठी २६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

वाणिज्य विद्याशाखेच्या पदव्युत्तर तीन अभ्यासक्रम असून १०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी ५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Parbhani Crime : सामायिक बांधावरून पेटला वाद, शेतातच घडला थरकापजनक खून; दोन तासांत आरोपी जेरबंद!

पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ५ जे ३० जूनदरम्यान ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. यामध्ये वाणिज्य विद्याशाखेत १०८, मानव्यविद्या ८०७, विज्ञान व तंत्रज्ञान शाखा ८४३ जणांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली. सर्व अभ्यासक्रमांसाठी मिळून सोमवार सायंकाळपर्यंत दोन हजार ८१० जणांनी नोंदणी केली आहे.

- डॉ. प्रवीण यन्नावार,

अध्यक्ष, प्रवेश समिती, विद्यापीठ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.