टीम इंडियाला शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने भारतावर 5 विकेट्सने मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. आता उभयसंघातील दुसरा सामना हा 2 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये आयोजित करण्यात आला आहे. भारताच्या काही खेळाडूंचा अपवाद वगळता बहुतांश खेळाडूंनी निराशा केली.त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम मॅनेजमेंट प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. त्यामुळे भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? कुणाला संधी मिळू शकते? कुणाला वगळलं जाऊ शकतं? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पहिल्या कसोटी सामन्यात एकूण 43 ओव्हर बॉलिंग केली आणि 5 विकेट्स घेतल्या. बुमराहला दुसऱ्या डावात विकेट मिळाली नाही. मात्र बुमराहने चिवट बॉलिंग केली. मात्र बुमराहला इतर गोलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.
बुमराहने वर्कलोड मॅनजमेंटमुळे इंग्लंड दौऱ्यातील 5 पैकी 3 सामनेच खेळणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे बुमराह दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही? हे निश्चित नाही. मात्र बुमराह निवडीसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती कर्णधार शुबमन गिल याने दिली. तसेच बुमराहला पहिल्या सामन्यानंतर एकूण 7 दिवस विश्रांती मिळाली. त्यामुळे बुमराह खेळूही शकतो. मात्र बुमराह भारताच्या महत्वाच्या खेळाडूंरपैकी एक आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट बुमराहबाबत कोणतीही जोखीम घेणार नाही.
बुमराह जर दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनचा भाग नसेल तर त्याच्या जागी कोण? हा प्रश्न उपस्थित होतो. अशात बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. अर्शदीपला इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. अर्शदीपची ही जमेची बाजू आहे.
ऑलराउंडर शार्दुलला पहिल्या सामन्यात बॅटिंगने काही खास करता आलं नाही. शार्दुलने एकूण 5 धावा केल्या. तर कॅप्टन शुबमनने शार्दूलला बॉलिंगसाठी फार संधी दिली नाही. मात्र त्यानंतरही शार्दुलने 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे शुबमन शार्दुलच्या जागी नितीश कुमार रेड्डी याला संधी देऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघात किमान 2 बदल होण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज आणि प्रसीध कृष्णा.