यजमान इंग्लंड क्रिकेट टीम 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात इंग्लंडने पाहुण्या भारतीय संघावर लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मात केली. इंग्लंडने विजयासाठी मिळालेलं 371 धावांचं आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा कसोटी सामना हा 2 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी 2 दिवसांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत आपण सज्ज असल्याचं जाहीर केलं. तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाचं हा सामना जिंकून पहिल्या पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न असणार आहे.
उभयंसघातील दुसरा सामना हा बर्मिंगहॅममधील एजबॅस्टनमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारताला या मैदानात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे भारतावर मालिकेत बरोबरी करण्यासह इंग्लंडला सलग दुसरा विजय मिळवण्यापासून रोखण्याचं दुहेरी आव्हान आहे. या निमित्ताने इंग्लंड विरुद्ध इंडिया या दोघांपैकी टेस्टमध्ये कोण सरस राहिलं आहे? हे आकड्यांच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात.
इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 137 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडने या 137 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. इंग्लंडने टीम इंडियाचा 52 सामन्यांमध्ये पराभव केला आहे. तर टीम इंडियाने 35 सामन्यांमध्ये पलटवार करत इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. तर दोन्ही संघातील 50 सामने अनिर्णित राहिले आहेत.
दरम्यान भारताला आतापर्यंत बर्मिंगहॅममध्ये विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. भारताने या मैदानात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकूण 8 सामने खेळले आहेत. भारताला 8 पैकी 7 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. तर एकमेव सामना हा अनिर्णित राखण्यात यश आलं आहे. त्यामुळे शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघ गेल्या अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवत या मैदानात पहिला विजय मिळवणार का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.