Spruha Joshi: 'सत्ताधारी कुणी विरोधी, मोठी राजघराणी...' हिंदी सक्तीच्या वादावर स्पृहा जोशी काय म्हणाली?
Saam TV July 01, 2025 05:45 PM

मागील अनेक दिवसांपासून राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून वाद सुरू आहे. अशातच राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतला आहे. रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याने या निर्णयाला सर्वच स्तरावरून विरोध झाला होता. राजकीय मंडळीपासून ते सामाजिक कार्यकर्ते, कलाकार हिंदी सक्तीला विरोध करत आहेत. अशातच अभिनेत्री स्पृहा जोशीने देखील एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Chhaya Kadam : कपाळावर टिळा अन् पारंपरिक साज; मराठमोळी अभिनेत्री पंढरीच्या वारीत, पाहा VIDEO

अभिनेत्री स्पृहा जोशी ही उत्तम अभिनेत्रीसह कवियित्री देखील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पृहा जोशी कविता शेअर करत असते. नुकतंच स्पृहाने कवितेच्या माध्यमातून तिच्या भावना मांडल्या आहेत. स्पृहाने शेअर केलेल्या कवितेत तिन म्हटलं आहे की,

जीआर रद्द झाला खरा.. पण!!!

ज्ञानोबांची अमृतबोली

ज्ञानाची रसगंगा

मायबोलिच्या उरे अंगणी

आता केवळ दंगा

परंपरेतुन अभंग झाली

अमुची मायमराठी

अभिजात तिचे सौंदर्य देखणे,

कायम अमुच्या पाठी..

परंतु चाले खेळ अनोखा

महाराष्ट्र देशा

अपुल्या डोळ्यासमोर हरवे

आपुलीच हो भाषा.

सत्ताधारी कुणी विरोधी

मोठी राजघराणी

हताश होऊन बघे मराठी

उदास केविलवाणी !

मंत्रालय वा हो न्यायालय

दबकत पाउल टाकी..

अधिक- उणे च्या गणितामध्ये

उरली केवळ ‘बाकी!’

श्रेय लाटुनी मराठिचे

वर उद्धाराच्या बाता

मुळी न वाटे लाज तयांना

नक्राश्रू ढाळता..

राजनीतिच्या पटावरूनी

हलती प्यादी सारी,

उगा उमाळे, कढ हे खोटे

बोलायाची चोरी!

दुस्वासा कुठल्या भाषेच्या

मुळी नसावा थारा

सक्तीने पण होऊन जातो

जीव उगाच बिचारा !

कोणासाठी कोणा कारण

हा कट रचला जातो..

एकशे पाच हुतात्म्यांचा

श्वास पुन्हा गुदमरतो..

मायबोलिच्या पुनरुथ्थाना

असेच काही व्हावे

ज्ञानोबांनी सदेह आता

मराठदेशी यावे!!

- स्पृहा

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

स्पृहाने शेअर केलेली ही कवितेवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. केवळ चाहतेच नाही तर कलाकार मंडळी देखील स्पृहाच्या कवितेचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर स्पृहा जोशींची कविता अनेकांना आवडली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.